शिरवळ :
वाढत्या औद्योगिक क्रांतीबरोबरच शिरवळ खंडाळा औद्योगिक वसाहतीमधील शांतताभंग होत रक्तरंजित वादाचे गालबोट लागण्याचे प्रकारही घडलेले दिसून येत आहेत. बुधवार दि. 12 रोजी रात्री 11:20 वाजण्याच्या दरम्यान शिरवळ औद्योगिक वसाहतीमधील पिडीलाईट कंपनीजवळ कंपनीतील जुन्या वादाचे पर्यवसान एका 22 वर्षीय युवकाच्या निर्घृण हत्येमध्ये झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अमर शांताराम कोंढाळकर (वय 22 रा. वडवाडी ता. खंडाळा) व तेजस महेंद्र निगडे (वय – 19 रा. गुनंद ता. भोर, जि. पुणे) यांच्यामध्ये सहा महिन्यापूर्वी वादावादी झाली होती. या वादामध्ये अमरकडून तेजस यास मारहाण झाली होती. तेजसला झालेल्या मारहाणीचा राग तेजस याच्या डोक्यात होता. या वादाच्या रागातून तेजसने मोका साधत अमर कोंढाळकरवर तलवारीच्या साह्याने शिरवळ एमआयडीसी एरियामधील एका कंपनीच्या बाहेर प्राणघातक हल्ला चढविला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी अमरला तत्काळ दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच अमर मृत झाला असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केले.
- साहेब मी एकाचा खून केलाय…
हत्या केल्यानंतर तेजस निगडे स्वत:हून शिरवळ पोलीस ठाण्यात हजर झाला आणि स्वत: हा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, महिला पोलीस उपनिरीक्षक नयना कामठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ, पो. ह. भाऊसाहेब दिघे, सुरज चव्हाण, दीपक पालपेवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची गंभीर दखल घेत फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनीही रात्री उशिरा भेट देत मार्गदर्शन केले. तेजस निगडे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून शिरवळ पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे शिरवळ औद्योगिक वसाहतीत तणावपूर्ण शांतता आहे.








