तिरुपूरमध्ये मोठा तणाव, मोठा बंदोबस्त
वृत्तसंस्था/ तिरुपूर
तामिळनाडूच्या तिरुपूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली आहे. तिरुपूरच्या कल्लाकिनारु गावात ही घटना घडली आहे. शेतात मद्यपान करण्यास मनाई करण्याच्या वादातून या हत्या झाल्याचे समजते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. तर हत्येच्या घटनेनंतर परिसरातील तणावाचे वातावरण पाहता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
49 वर्षीय शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या झाली आहे. शेतकऱ्याने स्वत:च्या जमिनीत मद्यपान करण्यापासून काही जणांना रोखले होते. यावरून मोठा वाद झाला होता. या वादानंतर आरोपींनी सेंथिल कुमार (49 वर्षे), त्यांचे चुलत बंधू मोहनराज (47 वर्षे), पुष्पावती (65 वर्षे) आणि रातिनामबल (55 वर्षे) यांची हत्या केली आहे. हत्येची घटना उघडकीस आल्यावर संतप्त ग्रामस्थांनी पल्लादाम-धारापुरम महामार्गावरील वाहतूक रोखली आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यास नकार दिला. मारेकऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









