आर्थिक व्यवहारातून कृत्य : दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात, मृतदेहाचे तुकडे करुन टाकले होते कूपनलिकेत
प्रतिनिधी, चिकोडी / बेळगाव
हिरेकोडी (ता. चिकोडी) येथील नंदीपर्वत जैन आश्रमातील बुधवारी बेपत्ता झालेल्या जैन मुनी आचार्य 108 कामकुमारनंदी महाराज यांचा निर्घृण खून झाल्याचे उघडकीस आले आहे. आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली असून खुनानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते कूपनलिकेत टाकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ‘अहिंसा परमो धर्म:’ याची शिकवण देणाऱ्या जैन मुनींच्या हत्येमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

याप्रकरणी नारायण बसाप्पा माळी (वय 32) मूळचा रा. कटकभावी (ता. रायबाग), सध्या राहणार हिरेकोडी, त्याचा साथीदार हसन ढालायत (वय 30) रा. चिकोडी यांना अटक करण्यात आली आहे. स्वत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून जैन मुनींच्या मारेकऱ्यांना कायद्याचा हिसका दाखविण्याची सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे.
बुधवार दि. 5 जुलै रोजी रात्री 10 पर्यंत मुनी महाराज आश्रमात होते. गुरुवारी सकाळी भाविकांचे आश्रमात आगमन होताच पिंची, कमंडलू व मोबाईल सोडून आपल्या कक्षातून महाराज बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला. गेल्या 15 वर्षांपासून मुनी महाराजांचे हिरेकोडी आश्रमात वास्तव्य होते. आश्रमाचा त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला विकासही झाला आहे. साहित्य कक्षातच आहे तर महाराज गेले तरी कोठे? असा प्रश्न भाविकांतून उपस्थित होत होता.
गुरुवारी महाराज आश्रमातून बेपत्ता झाल्याचे समजताच भाविकांकडून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने आचार्य कामकुमारनंदी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमाप्पा उगारे यांनी चिकोडी पोलिसात महाराज बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. आश्रमाला चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार, निरीक्षक आर. आर. पाटील, उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली यांनी भेट देवून तपास सुरू केला होता.
उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली यांनी मुनी महाराजांच्यासोबत झालेल्या मागील घटनांचा ताळमेळ घालून त्यांची माहिती घेतली. यावेळी तपास करताना मुनी महाराजांनी आपल्याला पैसे दिले होते ते पैसे परत मागत असल्याने नारायण माळीने सहकाऱ्याच्या मदतीने मुनी महाराजांचा खून केला व मृतदेह रायबाग तालुक्यातील कटकभावी येथे कूपनलिकेत टाकला असल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी रात्री याबाबत पोलिसांनी संपूर्ण माहिती घेऊन शनिवारी सकाळपासूनच कटकभावी येथे मुनी महाराजांचा मृतदेह टाकलेल्या ठिकाणाची जेसीबीने खोदाई करण्याचे काम सुरू केले होते. या ठिकाणी सर्वांना प्रवेशबंदी करण्यात आली होती.
हिरेकोडी गावावर शोककळा
आचार्य श्री. 108 कामकुमारनंदी महाराजांची हत्या केल्याचे स्पष्ट होताच शुक्रवारी रात्रीपासून हिरेकोडी येथे वातावरण तंग झाले. अनेक भाविकांच्या डोळ्dयातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आहेत. गावावर शोककळा पसरली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हिरेकोडी येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
साक्षी पुराव्यासाठी खबरदारी
याबाबत बोलताना जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी महाराजांच्या मृतदेहाचे शोध कार्य सुरु असून त्या ठिकाणी कोणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही. साक्षी पुरावे जप्त करून न्यायालयासमोर सादर करण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. या हत्येमागे आणखीन कोणते कारण आहे का? याबाबत चौकशी करण्यात येत आहे. महाराजांनी दिलेले पैसे परत मागितल्याने त्यांच्या खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
मुनींकडून घेतले होते 6 लाख रुपये
रायबाग तालुक्यातील कटकभावी येथील नारायण माळी हा मजुरीसाठी गेल्या कांही वर्षापासून हिरेकोडी येथे वास्तव्यास होता. त्याने कामकुमार मुनी महाराज यांच्याकडून 6 लाख रुपये घेतले होते. मुनी महाराजांनी दिलेले पैसे परत मागितल्याने नारायण याने मित्र हसन ढालायत याच्या मदतीने खून केला. यानंतर मृतदेह आपल्या मुळ गावी कटकभावी येथे नेत त्याचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले होते.
मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
जैन मुनींच्या हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारेकऱ्यांना कायदेशीर शिक्षा होईल, यासाठी न्यायालयात साक्षी-पुरावे हजर करण्याची सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. या घटनेने आपल्यालाही धक्काच बसला आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखविला जाणार आहे. तो अधिकार कोणालाच नाही. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला असून पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत आरोपींची सुटका होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची सूचना आपण पोलीस अधिकाऱ्यांना केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी बेंगळूर येथे सांगितले.
पोलिसांची मोहीम
हिरेकोडी येथील खळबळजनक खून प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एम. वेणुगोपाल आदी वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी रात्रीच हिरेकोडीला रवाना झाले. शनिवारी दिवसभर कटकभावी येथे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार, पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
मुनी महाराजांच्या पार्थिवावरआज अंत्यसंस्कार
भीषण हत्या करण्यात आलेल्या जैन मुनी महाराजांवर रविवार दि. 9 जुलै रोजी दुपारी आश्रम परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नंदीपर्वत आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. भीमाप्पा उगारे यांनी ही माहिती दिली आहे. महाराजांनी कोणावरच अन्याय केला नाही. ते नेहमी जगाच्या सुखासाठी, शांततेसाठी प्रार्थना करीत होते. अशा महाराजांचा खून करण्यात आला आहे. मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अत्यंत निर्दयी कृत्य
मुनी महाराजांकडून नारायण माळीने आपल्या अडचणीला पैसे घेतले होते. दिलेले पैसे परत मागितल्यामुळे नारायणने महाराजांचा भीषण खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चिकोडी येथील हसनची मदत घेतली. अत्यंत निर्दयीपणे मृतदेहाचे तुकडे करून ते कूपनलिकेत टाकण्यात आले. तब्बल 30 फुटाहून अधिक खोदाई केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे आढळून आले आहेत. हात, पाय व इतर अवयवांचे तुकडे करण्यात आले होते. या प्रकाराने तपास अधिकारीही चक्रावले असून संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
हिरेकोडी गावात प्रचंड पोलीस बंदोबस्त
(8 एनपीएन 32)
हिरेकोडी येथील नंदीपर्वताचे जैनमुनी श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या निर्घृण हत्येमुळे जिह्यासह संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिह्यातील अनेक गावात शांतता पसरली आहे. खून केलेल्या आरोपीने दिलेल्या जबानीनुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच रायबाग तालुक्यातील कटकभावी गावात जैनमुनी यांच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. शनिवारी दुपारपर्यंत मृतदेह न सापडल्याने भाविक चिंतेत पडले होते. हिरेकोडी येथील नंदी पर्वताजवळ शेकडो भाविकांनी अश्रू ढाळले. खबरदारीचा उपाय म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराजांचा जीवनप्रवास
हिरेकोडी गावाच्या पायथ्याशी तेरा वर्षांपूर्वी नंदीपर्वत आश्रम कामकुमार यांनी विकसित केले. महाराज हे मूळचे अथणी तालुक्यातील कवटखोप्प येथील आहेत. त्यांचे मूळ नाव भरमप्पा भीमप्पा उगारे आहे. 1967 मध्ये जन्मलेल्या महाराजांना 7 भाऊ, तीन बहिणी, असून दोन भाऊ मरण पावले आहेत. बी. ई. पदवीधर असूनही महाराजांचा अध्यात्माकडे कल होता. महाराजांना अकलुज येथे श्री कुंथुसागर महाराजांनी संन्यासी म्हणून नियुक्त केले होते.
महाराजांनी दिल्ली, हिमालय, डेहराडून येथे प्रवास केला. त्यानंतर ते धार्मिक प्रसारणात गुंतले. कन्नड, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये महाराज पारंगत होते. त्यांनी अनेक धार्मिक पुस्तकांचीही रचना केली. ते संगीतप्रेमी देखील होते. त्यांनी अनेक भक्तिगीते रचली. उत्तम वत्ते असल्याने ते हृदयस्पर्शी धार्मिक प्रवचन देत असत. 2008 मध्ये ते हिरेकोडी गावात आले. तेथे चार्तुमास केला. त्यानंतर दोन वर्षांसाठी मुंबईला गेले. त्यांनी तिथेही धर्माचा प्रसार केला. 2010 मध्ये हिरेकोडीला परत आले. नंदी पर्वत नावाने आश्रमाची स्थापना करुन ते धार्मिक कार्यात गुंतले. आश्रमातच प्राथमिक शाळा चालवल्याचे त्यांचे नातेवाईक सुनंदा महावीर उगारे यांनी सांगितले.
एसडीआरएफची मदत
मुनी महाराजांच्या मृतदेहाचे तुकडे उत्तरीय तपासणीसाठी बिम्सला पाठविण्यात आले आहेत. कूपनलिकेतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफची मदत घेण्यात आली असून विधिविज्ञान प्रयोगशाळेचे तज्ञही घटनास्थळी तळ ठोकून होते.
जैन समाज व जैन मुनींना चिंता
या भीषण खुनाने मुनी महाराजांच्या संरक्षणासाठी प्रश्न ऐरणीवर आला आहे. हुबळी येथील आचार्य गुणधर नंदी महाराजांनी या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध केला असून जैन मुनींना संरक्षणच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने संरक्षणाची लेखी हमी देईपर्यंत आपण उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या प्रकाराने जैन समाज व जैन मुनींची चिंता वाढली आहे. आपल्यालाही जीवाचे भय वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी या प्रकरणाच्या तपासात उत्तम कामगिरी केली आहे. सरकारला अल्पसंख्याकांची गरज राहिली नाही. जैन मुनींना संरक्षण द्यावे. यासंबंधी लेखी हमी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली असून मुनी महाराजांच्या हत्येच्या घटनेने त्यांना अश्रू अनावर झाले होते.









