4 ते 8 महिन्यांच्या वासरू-रेडकांना डोस : रोगप्रतिबंधसाठी पशुसंगोपनची मोहीम
बेळगाव : पशुसंगोपन खात्यामार्फत ब्रुसेलोसिस या संसर्गजन्य रोगाला आळा घालण्यासाठी येत्या 15 मार्चपासून प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. 4 ते 8 महिन्यांच्या वासरू आणि रेडकांना लस दिली जाणार आहे. पशुपालकांनी संभाव्य धोका ओळखून लस टोचून घ्यावी, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे. अलीकडे जनावरांना वेगवेगळ्या आजारांची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून खात्याने प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे. ब्रुसेलोसिस हा अतिघातक रोग असून जनावरांना लागण झाल्यास गर्भपाताची शक्यता असते. शिवाय अशा जनावरांच्या संपर्कात आल्यास मानवालाही त्याचा धोका आहे. त्यामुळे पशुपालकांनी खबरदारी म्हणून आपल्या जनावरांच्या वासरांना लस द्यावी.
सर्व वासरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट
जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये लहान वासरांची संख्याही मोठी आहे. यामध्ये 4 ते 8 महिन्यांच्या वयोगटातील वासरांना ब्रुसेलोसिसचे लसीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 34 हजार 150 इतकी वासरू आणि रेडकांची संख्या आहे. या सर्व वासरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट खात्याने ठेवले आहे. मागील दोन वर्षांत लम्पीने धुमाकूळ घातला होता. या आजारामुळे जिल्ह्यातील हजारो जनावरे मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे पशुपालकांना मोठा फटका बसला होता. त्याचबरोबर इतर आजारांना आळा घालण्यासाठी पशुसंगोपनने प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक तीव्र केली आहे. जनावरांना वेळेत लसीकरण करण्यासाठी सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना औषधांचा पुरवठा केला आहे. येत्या 15 मार्चपासून जिल्ह्यात सर्वत्र प्रतिबंधक लस वासरांना टोचली जाणार आहे.
लसचा योग्य साठा उपलब्ध
जिल्ह्यात एकही वासरू लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. याबाबत सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. शिवाय जिल्ह्यात लसीचा योग्य साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
-डॉ. यरगट्टी (साहाय्यक निर्देशक पशुसंगोपन)









