ईडीसमोर हजर रहावे लागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली अबकारी घोटाळय़ाप्रकरणी भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने कविता यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. परंतु न्यायालयाने त्यांची याचिका सूचीबद्ध करण्यास सहमती दर्शविली आहे. या याचिकेवर आता 24 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
याचदरम्यान कविता यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींविरोधात बोलणाऱया व्यक्तीला तपास यंत्रणांकडून लक्ष्य केले जाते. हा प्रकार योग्य नाही. सर्वांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तपास यंत्रणांनी प्रथम उद्योगसमुहावर छापे टाकले आणि त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मग मोदी सरकारने राजकीय पक्षांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही लढणार आहोत, आम्ही काहीच चुकीचे केलेले नाही. तपास यंत्रणेने बोलाविल्यावर आम्ही चौकशीला सामोरे जाऊ असे कविता यांनी म्हटले आहे.
कविता यांची यापूर्वी ईडीने शनिवारी चौकशी केली होती. सुमारे 9 तास चाललेल्या चौकशीदरम्यान कविता यांनी ईडीच्या अधिकाऱयांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येते. ईडीने आता कविता यांना 16 मार्च रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलाविले आहे.









