3 जुलैपर्यंत वाढली न्यायालयीन कोठडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाकडून बीआरएस नेत्या के. कविता यांना मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने सोमवारी कविता यांची न्यायालयीन कोठडी 3 जुलैपर्यंत वाढविली आहे. दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या कविता यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. ईडीने कविता यांना 15 मार्च रोजी अटक केली होती.
अबकारी धोरण घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास ईडीसोबत सीबीआय देखील करत आहे. 21 मे रोजी राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने कविता यांची कोठडी 3 जूनपर्यंत वाढविली होती. कविता या दिल्लीतील तुरुंगात कैद आहेत. तर दुसरीकडे अन्य दोन आरोपी प्रिन्स आणि दामादोरला 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या दोन्ही आरोपींना ईडीने तपासादरम्यान अटक केली नव्हती.
कविता या ‘साउथ ग्रूप’च्या प्रमुख सदस्य होत्या, या ग्रूपने दिल्लीत मद्याचे परवाने प्राप्त करण्यासाठी आम आदमी पक्षाला 100 कोटी रुपयांची लाच दिली होती असा आरोप आहे. घोटाळ्याचा आरोप झाल्यावर अबकारी धोरण रद्द करण्यात आले होते. अबकारी धोरणाशी माझे कुठलेही देणेघेणे नाही. माझ्याविरोधात केंद्रातील सत्तारुढ भाजपकडून कट रचला जात असल्याचा दावा कविता यांनी स्वत:च्या याचिकेत केला होता. याच घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगात आहेत.









