मद्य धोरण प्रकरणात ईडीची कारवाई : चौकशीसाठी हैदराबादहून दिल्लीला हलवले
हैदराबाद, नवी दिल्ली
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याबाबत सीबीआय आणि ईडीने केलेला तपास आतापर्यंत अनेक बड्या राजकारण्यांपर्यंत पोहोचला आहे. आता या प्रकरणात ईडी तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविताला अटक करण्यात आली असून तिला हैदराबादहून दिल्लीत आणले जात आहे. केंद्रीय तपास संस्थेने हैदराबादमधील बंजारा हिल्स येथील निवासस्थानातून सायंकाळी 5:20 वाजता अटक केली. तिचे पती डी. आर. अनिल कुमार यांना तिच्या अटकेची माहिती देण्यात आली होती, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्ली मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी भारत राष्ट्र समितीच्या एमएलसी (विधान परिषद सदस्या) कविता यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानाची झडती घेतली. त्यानंतर तिला अटक करून दिल्लीला नेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दोन समन्स बजावूनही चौकशीत सहभागी न झाल्याने तपास यंत्रणांनी तिच्यावर ही कारवाई केली आहे.
गेल्यावषी याप्रकरणी कविता यांची ईडीकडून तीनदा चौकशी करण्यात आली होती. तपास यंत्रणांनी त्यांचे मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत जबाब नोंदवले होते. दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील एक आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के कविता हिचे नाव घेतल्यानंतर त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या होत्या. या तपासानंतर त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता.









