शाळेत जाणारे विद्यार्थी अनेक नियमांच्या अधीन असतात आणि त्यांनी विशिष्ट वस्तू शाळेत आणू नयेत, असा नियम महत्वाचा आहे. विशेषत: मोबाईल आणण्यास बहुतेक सर्व शाळांमध्ये बंदी असते. नियम मोडून विद्यार्थ्याने मोबाईल आणलाच, तर तो जप्त केला जातो आणि शाळा सुटताना विद्यार्थ्याला परत दिला जातो. हा नियम सारखा मोडला गेला, तर पालकांना त्याची कल्पना दिली जाते आणि त्यांना दंड केला जातो. तथापि, चीनमधील एका शिक्षिकेने जो प्रकार केला, त्याची आज सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच उलटसुलट मतेही व्यक्त होत आहेत.
चीनच्या गुईजाऊ प्रांतातील एका शाळेत काही विद्यार्थ्यांर्नी नियम मोडून मोबाईल आणले. त्यांना शिक्षिकेने एका वेगळ्याच प्रकारे शिक्षा केली. तिने या विद्यार्थ्यांना छड्या मारल्या नाहीत, की कोणत्याही अन्य प्रकारची शारिरीक शिक्षा केली नाही. ज्या विद्यार्थ्यांनी मोबाईल आणले होते, ते तिने त्यांना एका पाण्याने भरलेल्या टबमध्ये टाकावयास लावले. त्यामुळे हे फोन काही काळानंतर पाण्यात बुडाले आणि खराब झाले. त्यांची दुरुस्ती करावी लागली. परिणामी हा प्रकार पालकांनाही समजला. अखेर विद्यार्थ्यांनी शाळेत मोबाईल आणणे अपोआप बंद केले. कारण त्यांना नेहमी दुरुस्तीचा खर्च परवडेनासा झाला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांची ही नियम मोडण्याची प्रवृत्ती या शिक्षिकेने मोडून काढली. अर्थात हा मार्ग इतर शिक्षकांनी आचरणात आणू नये. कारण प्रत्येक स्थानी परिस्थिती वेगवेगळी असते, असेही अनेकांनी या घटनेवर प्रतिपादन केले आहे.









