संशयित भावास अटक, अल्पवयीन पुतण्यासही ताब्यात घेतले आहे
लातूर : सोयरिकीचेनिमित्त करून सख्ख्या भावाला एका गावात बोलावून घेत त्याठिकाणी त्याचा गळा आवळून व डोक्यात हातोडा मारून खून करण्यात आला. ही घटना लातूर तालुक्यातील कव्हा शिवारात शेतीच्या वादातून घडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने संशयित भावास अटक केली असून अल्पवयीन पुतण्यासही ताब्यात घेतले आहे.
कव्हा (ता. लातूर) शिवारातील स्मशानभूमीशेजारी एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राजेश घाडगे यांच्या पथकाने अवघ्या 12 तासांत खुनी भावास अटक करून अल्पवयीन पुतण्यास ताब्यात घेतले.
दयानंद भगवान काटे (वय 55, रा. बोपला) असे मृताचे नाव आहे. तर देवानंद भगवान काटे (रा. बोपला) असे संशयित आरोपी भावाचे नाव आहे. मृत दयानंद यांना एका फोनवरून सोयरिकीच्या निमित्ताने कव्हा येथे या, मी लग्न जमवणारा एजंट बोलतोय, असे सांगून दयानंद यांना कव्हा येथे बोलावून घेण्यात आले. तेथे गेल्यावर एजंट म्हणून फोन करणारा सख्खा भाऊ देवानंद व त्याचा अल्पवयीन मुलगा चारचाकी गाडी घेऊन वाट पाहत होते.
तिथे दयानंदची देवानंदशी भेट झाली. भाऊ इथे कसे काय, अशी विचारणा केली. आपणास तर सोयरिक करणारा एजंटचा निरोप होता, अशा चिंतेत असतानाच देवानंद याने दयानंद यास कासरावजा दाव्याने गळा आवळून व डोक्यात हातोडा मारून खून केला. त्यानंतर मृतदेह तिथेच सोडून दोघे पसार झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दयानंद काटे यांच्या खूनप्रकरणी सख्खा भाऊ देवानंद यास अटक केली तर देवानंदच्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.
देवानंद व दयानंद यांच्या बोपला शिवारात जमीन बांधाला बांध लागून आहेत. पण दयानंद हा दरवर्षी माझ्या हिश्श्यात येतो, त्याला सांगूनही उपयोग होत नाही, त्याला कायमचा संपवायचा असा कट करून देवानंदने कव्हा शिवारात दयानंद याला बोलवले.
तुमच्या मुलासाठी मुलगी दाखवितो, मी सोयरीक करणारा एजंट आहे, अशी बतावणी केली व त्याचा खून केला. तपासासाठी उपनिरीक्षक राजेश घाडगे यांच्या विशेष पथकाने विशेष प्रयत्न केले. हवालदार अर्जुन राजपूत, युवराज गिरी, राजेश कंचे, राहुल सोनकांबळे, मुन्ना मदने, जमीर शेख, गणेश साठे आदींनी परिश्रम घेतले.
खुनाच्या कटासाठी वापरला सापडलेला मोबाईल
भावाला गावापासून दूर बोलावून खून करण्याचे प्लॅनिंग त्याच्या डोक्यात होते. त्यासाठी आरोपी सोयरीक करणारा एजंट बनला. देवानंदने वारंवार दयानंदला मोबाईल करून निरोप देत राहिला. देवानंदने निरोप देण्यासाठी मात्र त्याला एका सापडलेल्या मोबाईलचा वापर केला. निरोप देण्यासाठी देवानंद वापरत असलेला मोबाईल लातूर तालुक्यातील एका महिलेच्या नावावर आहे.
तो काही दिवसांपूर्वी हरवला. मात्र, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. तो मोबाईल देवानंदला सापडला असे सांगतात. या मोबाईलवरून देवानंद दयानंदला निरोप द्यायचा. एजंट वारंवार मुलीसाठी फोन करतोय म्हणून दयानंद कव्हा शिवारात गेला. तिथे एजंट नव्हे तर सख्खा भाऊ आणि पुतण्या दिसला. त्यांनी तिथेच गळा आवळून व डोक्यात हातोडा मारून दयनांदचा खून केला.








