मलिकवाड-नणदी मार्गावरील घटना : देवदर्शनाला जाताना काळाचा घाला : सदलगा पोलिसांत नोंद
वार्ताहर /मलिकवाड
देवदर्शनासाठी चिकोडीकडे जाताना मलिकवाड-नणदी रस्त्यावरील शर्यतीमाळाजवळ नेक्सा बलेनोने अॅक्टिवाला धडक दिल्याने भाऊ- बहीण जागीच ठार झाले. प्रशांत नागराज तुळशीकट्टी (वय 20), प्रियांका नागराज तुळशीकट्टी (वय 19) दोघेही राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, सदलगा अशी मृतांची नावे आहेत. घटनेविषयी अधिक माहिती अशी, प्रशांत व प्रियांका हे दोघे होंडा अॅक्टिवा (केए 23 इएम 3637) वरुन चिकोडीला परटी नागलिंगेश्वराच्या दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी समोरुन मलिकवाड येथील निवृत्त सैनिक दादासाहेब सत्याप्पा कोळी (वय 60) त्यांच्या मुलग्यासह नेक्सा बलेनो या नवीन चारचाकी (टी 082 जीए 4818ए) कारमधून गोव्याकडून चिकोडीमार्गे मलिकवाडकडे येत होते. त्यावेळी सदर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन अॅक्टिवासह भाऊ-बहीण उडून बाजूला फेकले गेले. सदलग्यातील हेस्कॉम कंत्राटदार नागराज तुळशीकट्टी यांची दोन्ही मुले प्रशांत आणि प्रियांका या भाऊ-बहिणीच्या वर्मी दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील दोन्ही प्रवाशांना एअरबॅगमुळे दुखापत झाली नाही. कारच्या उजव्या बाजूचा चुराडा झाला तर अॅक्टिवाचा चक्काचूर झाला आहे. सदलगा पोलीस स्थानकाच्याबाहेर प्रशांत व प्रियांकाच्या आईवडिलांनी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.









