रामदुर्ग तालुक्यातील उदपुडी येथे अंघोळीसाठी गेले असता दुर्घटना
वार्ताहर/रामदुर्ग
अंघोळ करण्यासाठी चेकडॅममध्ये उतरलेल्या बहीण-भावाचा पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना रामदुर्ग तालुक्यातील उदपुडी येथे शुक्रवारी दुपारी घडली आहे. उदपुडी येथील इरण्णा सिद्धप्पा सिरसंगी (वय 13) व गुरव्वा सिद्धप्पा सिरसंगी (वय 11) अशी मृत मुलांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी की, इरण्णा व गुरव्वा ही दोन्ही भावंडे गावातील हणमंतगौडा पाटील यांच्या जमिनीमध्ये असणाऱ्या चेकडॅममध्ये उतरली असता त्यांना पोहता येत नसल्याने अकस्मात पाण्यात बुडून मृत झाल्याची फिर्याद मुलांचे वडील सिद्धप्पा सिरसंगी यांनी कटकोळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. घटनेची माहिती कळताच कटकोळचे पीएसआय बसवराज कोण्णूरे यांनी घटनास्थळास भेट देत माहिती घेतली आहे. या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.









