वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने आघाडीचे स्थान मिळविताना आपल्याच देशाच्या जो रुटला मागे टाकले आहे. तर गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या जसप्रित बुमराह आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. तसेच अष्टपैलुंच्या मानांकनात रविंद्र जडेजाने अग्रस्थान मिळविले आहे.
गेल्या आठवड्यात वेलिंग्टनमध्ये झालेल्या न्यूझीलंडबरोबरच्या दुसऱ्या कसोटीत 25 वर्षीय ब्रुकने कसोटीतील आपले आठवे शतक झळकविले. ब्रुकने 898 मानांकन गुणांसह फलंदाजीमध्ये पहिले स्थान मिळविले असून रुट दुसऱ्या स्थानावर आहे. रुट आणि ब्रुक यांच्यात आता केवळ एका गुणाचा फरक आहे. रुटने गेल्या जुलै महिन्यापासून कसोटी फलंदाजांच्या मानांकन यादीत आपले अग्रस्थान कायम राखले होते.









