दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा
बेळगाव : मालदीव येथे झालेल्या 13 व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या वेंकटेश ताशिलदारने 65 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावित यश संपादित केले आहे. प्रवीण कणबरकर याला 70 किलो वजनी गटात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आयबीबीएफ फेडरेशनने आयोजित केलेला राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या वेंकटेश ताशिलदार व प्रवीण कणबरकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. याची दखल घेऊन भारतीय शरीरसौष्ठव संघटनेने यांची दक्षिण आशियाइ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड केली होती. या स्पर्धेत 65 किलो वजनी गटात वेंकटेश ताशिलदारने आपल्या पिळदार शरीराचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावित भारताचा तिरंगा ध्वज फडकवला.
70 किलो वजनी गटात बेळगाव कर्नाटकचा प्रवीण कणबरकरने अंतिम फेरीत धडक मारली. पण या स्पर्धेत त्याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या दोघांना कर्नाटक शरीरसौष्ठव संघटनेचे उपसचिव व आशियाई पंच अजित सिद्धन्नावर, सुनील राऊत व प्रशिक्षक प्रशांत बसरीकट्टी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. या यशानंतर वेंकटेश ताशिलदारचा भवानीनगरात खास सत्कार करण्यात आला. तो आरपीडी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून मनपा कर्मचारी किशोर ताशिलदार यांचा चिरंजीव आहे. यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.









