वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावचा सुपुत्र व उदयोन्मुख मल्ल शुभम पंडित पाटील याने नागालँड येथे नुकत्याच पार पडलेल्या दुसऱया खुल्या नागालँड कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये 74 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले. कंग्राळी खुर्द गावाबरोबर कर्नाटक राज्याचे नाव उज्ज्वल केल्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदर खुली कुस्ती स्पर्धा नागालँड येथे 1 ते 5 नोव्हेंबरपर्यंत पार पडली.
भारतीय कुस्ती नागा फेडरेशनचे उपाध्यक्ष नीखरोलो खालो व ऍखोन रिंगा यांच्याहस्ते कांस्यपदक व 5000 रुपये रोख पारितोषिक देऊन शुभमला गौरविण्यात आले. स्पर्धेमध्ये शुभमची पहिली कुस्ती विलन को बीओ नयाला याच्याबरोबर झाली. त्यात शुभमने 8ö3 गुणांनी विजय मिळविला. दुसऱया कुस्तीत आसामच्या अमोस पामेवर 6-5, तिसऱया कुस्तीत दिल्लीच्या ऋषभवर 8-4 गुणांनी विजय मिळविला. चौथ्या कुस्तीत मरक डोमेश मणिपूरवर विजय मिळविला. पण उपांत्य फेरीत तो पराभूत झाल्याने त्याला कांस्यपदक मिळाले. शुभमला कंग्राळी खुर्द गावचे ज्येष्ठ मल्ल ऑलिम्पिकपटू एम. आर पाटील, कृष्णा पाटील, काशिराम पाटील, मोनेश्वर पाटीलसह शुभमचे आई-वडिल व ग्रामस्थांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.









