वृत्तसंस्था/ ऍलेक्सेंड्रीया (इजिप्त)
येथे सुरु असलेल्या 2023 च्या इब्राहिम मुस्तफा मानांकन आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताच्या रितिका आणि अंकित गुलीया यांनी कांस्यपदके पटकाविली. या स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत 2 पदके मिळविली आहेत.

महिलांच्या 72 किलो वजन गटात भारताच्या रितिकाने जर्मनीच्या लिली स्किनेडेरचा तांत्रिक गुणावर 10-0 असा एकतर्फी पराभव करत कांस्यपदक पटकाविले. गेल्या वर्षी झालेल्या कनिष्ठांच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत रितिकाने कांस्यपदक तसेच 23 वर्षाखालील वयोगटातील झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळविले होते. रितिकाने 72 किलो वजन गटातील पहिल्या फेरीच्या लढतीत उजवेकच्या स्वेतलाना ओनाझेरोवाचा 13-1 असा पराभव केला होता. पण उपांत्य लढतीत रितिकाला इटलीच्या डेल्मा कॅनेव्हाकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत शनिवारच्या विविध गटातील लढतीत महिलांच्या विभागात रितिका वगळता उर्वरित भारतीय महिला मल्लांना पदक मिळविता आले नाही. 55 किलो गटात भारताच्या सुषमा शोकिनने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. तर 43 किलो गटात इजिप्तच्या ऍला अब्देलहेमने भारताच्या सिमरनचा पराभव केला. तसेच 59 किलो वजन गटात भारताच्या हर्षाला माल्डोव्हाच्या निचीताकडून 0-10 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला.
पुरुषांच्या विभागात भारताच्या अंकित गुलीयाने 72 किलो ग्रीकोरोमन पद्धतीच्या प्रकारात कांस्यपदक मिळविले. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत 19 वर्षीय अंकित गुलीयाने किर्जिस्थानच्या युलूचा तांत्रिक गुणावर पराभव केला. ग्रीकोरोमन प्रकारात भारताच्या मनजित, विक्रम कुराडे, नितिन, करणजीत, रोहित दाहिया, नरिंदर चीमा आणि नविन यांना आपल्या वजन गटातून पहिली फेरी पार करता आली नाही.









