वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दोहा येथे सुरू असलेल्या 27 व्या युवा आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या यू-15 व यू-19 मुलांच्या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत अनुक्रमे सिंगापूर व हाँगकाँग यांच्यावर विजय मिळविले असले तरी त्यांना अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. येत्या डिसेंबरमध्ये स्लोव्हेनियात होणाऱ्या विश्व युवा चॅम्पियनशिपसाठी ही पात्रता स्पर्धा होती.
भारताच्या दोन्ही संघांना उपांत्य फेरीच्या पुढे मजल मारता आली नसली तरी त्यांनी कांस्यपदक निश्चित केले. यू-15 मुलींच्या विभागात भारतीय मुलींना उपांत्यपूर्व फेरीत जपानकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र यू-19 मुलींच्या संघाने जपानविरुद्ध एक सामना जिंकला तरी त्यांना अखेर जपानकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
यू-15 मुलांच्या गटात पीबी अभिनंदने सिंगापूरच्या ली एल्सवर्थचा 11-9, 11-5, 11-7 असा पराभव करून महत्त्वाची भूमिका बजावली. प्रियानुज भट्टाचार्यला झिंग याओकडून कडवा प्रतिकार झाला तरी त्याने 11-8, 9-11, 11-5, 12-10 असा विजय मिळविला. आयर्ल एलेस व झोयू जिंघे यांच्याविरुद्ध भारतीय जोडीला संघर्ष करावा लागला. पण अखेर अभिनंद व भट्टाचार्य यांनी 11-8, 11-5, 7-11, 6-11, 11-7 अशी बाजी मारत आगेकूच केली. मात्र उपांत्य फेरीत त्यांना चीनकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला.
यू-19 मुलांच्या विभागात भारताला हाँगकाँगकडून कडवा प्रतिकार झाला. मात्र जश मोदीने केलेल्या शानदार खेळामुळे भारताला उपांत्य फेरीत स्घान मिळाले होते. यू-16 मुलांनाही उपांत्य फेरीत चीनकडून 0-3 अशी हार पत्करावी लागली तर यू-19 मुलींनी इराणवर 3-0 अशी मात करीत सातवे स्थान मिळविले.









