वृत्तसंस्था/ लोनॅटो (इटली)
येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ शॉटगन विश्व चषक 2023 च्या लोनॅटो नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा नेमबाज पृथ्वीराज तोंडाईमनने पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत कांस्यपदक मिळविले.
या स्पर्धेमध्ये भारताला मिळालेले हे एकमेव पदक पृथ्वीराजच्या नावावर आहे. पृथ्वीराजने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दोन वैयक्तिक पदके मिळविली आहेत. यापूर्वी त्याने गेल्या मार्च महिन्यात डोहा येथे झालेल्या स्पर्धेत पहिले कांस्यपदक मिळवले होते. लोनॅटो येथील या स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत ब्रिटनचा नेमबाज नाथन हॅलेसने 49 गुणासह सुवर्णपदक, चीनच्या क्वि यांगने 48 गुणासह रौप्यपदक तर पृथ्वीराजने 34 गुणासह कांस्यपदक मिळविली. सदर स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत भारताच्या एकाही महिला स्पर्धकाला पात्र फेरी पार करता आली नाही. या स्पर्धेत पदक तक्त्यात भारत नवव्या स्थानावर आहे. अमेरिका 2 सुवर्ण आणि 1 रौप्यपदकासह पहिल्या स्थानावर आहे.









