वृत्तसंस्था/ कैरो (इजिप्त)
आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टीक फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या विश्वचषक अॅपेरेटर्स जिमनॅस्टीक स्पर्धेत महिलांच्या व्हॉल्ट या प्रकारात भारताची महिला जिमनॅस्ट प्रणाती नायकने कांस्यपदक पटकाविले. येत्या जून-जुलै दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी ही पात्रतेची स्पर्धा आहे.
महिलांच्या व्हॉल्ट जिमनॅस्टीक प्रकारात भारताची 28 वर्षीय महिला जिमनॅस्ट प्रणाती नायकने 13.616 गुण घेत कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश मिळविणारी भारताची आणखी एक महिला जिमनॅस्ट दीपा कर्माकरला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 13.383 गुण नोंदविले. या क्रीडा प्रकारात प्रजासत्ताक कोरियाच्या अॅन चेंग ओकेने सुवर्णपदक मिळविताना 14.233 गुणांची नोंद केली. बल्गेरियाच्या व्हॅलेनटिना जॉर्जिव्हाने 13.616 गुणासह रौप्यपदक पटकाविले. व्हॅलेनटिना आणि प्रणाती नायक यांचे समान गुण झाले तरी तांत्रिक गुणावर व्हॅलेनटिनाने प्रणातीने व्हॅलेनटिनाला मागे टाकत कांस्यपदक हस्तगत केले. आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र फेरीचे उर्वरित तीन टप्पे जर्मनी, अझरबेजान आणि डोहा कतार येथे होतील.









