वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स (अमेरिका)
येथे शुक्रवारी झालेल्या 2023 च्या लॉस एंजिल्स ग्रा प्रि अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची महिला धावपटू पारुल चौधरीने कास्यपदक मिळविले. महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात तिने दर्जेदार कामगिरी करत आपल्या देशाला पदक मिळवून दिले.
चालू महिन्याच्या प्रारंभी लॉस एंजिल्स येथे झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मी. धावण्याच्या शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. त्यानंतर शुक्रवारच्या लॉस एंजिल्स ग्रा प्रि अॅथलेटिक्स स्पर्धेत पारुल चौधरीने महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात 9 मिनिटे, 29.51 सेकंदाचा अवधी घेत तृतीय स्थानासह कास्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात पारुल चौधरीने यापूर्वी 9 मिनिटे, 38.09 सेकंदाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी नोंदवली होती. अमेरिकेच्या मॅडी बोरमनने 9 मिनिटे, 22.99 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर पोलंडची टोकियो ऑलिम्पियन महिला धावपटू अॅलिसीजा कोनिझेकने 9 मिनिटे 25.51 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या लीली दासला महिलांच्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताच्या जिनसन जॉनसन आणि राहुलला अनुक्रमे 11 व्या आणि 12 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.









