वृत्तसंस्था/ चेंगडू
येथे सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताच्या 23 वर्षीय ज्योती येराजीने महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह कास्यपदक पटकावले.
या क्रीडा प्रकारात ज्योतीने 12.78 सेकंदाचा अवधी घेत तिसऱ्या स्थानासह कास्यपदक मिळवले. ज्योतीने यापूर्वी या क्रीडा प्रकारात स्वत:च 12.82 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. हा राष्ट्रीय विक्रम 2022 च्या ऑक्टोबरमध्ये केला होता. चेंगडूमधील या स्पर्धेत स्लोव्हाकियाच्या व्हिक्टोरिया फॉरस्टेरने सुवर्णपदक मिळवताना 12.72 सेकंदाचा अवधी घेतला असून चीनच्या यानी वूने 12.76 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेच्या पदक तक्त्यात भारत सध्या चौथ्या स्थानावर असून त्यांनी 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 9 कास्यपदके मिळवली आहेत. चीन पहिल्या, कोरिया दुसऱ्या तर जपान तिसऱ्या स्थानावर आहे.
या स्पर्धेमध्ये भारताच्या 25 वर्षीय अमलान बोर्गोहेनने पुरुषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत 20.55 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक घेतले. मात्र या क्रीडा प्रकारात त्याचा राष्ट्रीय विक्रम थोडक्यात हुकला. दक्षिण आफ्रिकेच्या मॅटसोसोने 20.36 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर जपानच्या निशीने 20.46 सेकंदाचा अवधीत रौप्यपदक पटकावले. भारताने शुक्रवारी या स्पर्धेत दोन पदकांची कमाई केली.









