वृत्तसंस्था/ भोपाळ
आयएसएसएफच्या विश्वचषक एअर रायफल नेमबाजीत विद्यमान विश्वविजेता भारताचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत चीनच्या नेमबाजांनी दर्जेदार कामगिरी करत स्पर्धेच्या सलग दुसऱया दिवशी आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
या स्पर्धेत शुक्रवारी पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱया चीनच्या शेंग लीहाओ याने सुवर्णपदक तर चीनच्या हुवांग युटिंगने रौप्यपदक पटकाविले. स्पर्धेच्या तिसऱया दिवसाअखेर पदकतक्त्यात चीनने आपले आघाडीचे स्थान अधिक मजबूत करताना 5 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली आहे. स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारत दुसऱया स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्यपदके आतापर्यंत मिळविली आहेत.
पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात पात्रफेरी अखेर रुद्रांक्ष पाटीलने 631.0 गुण नोंदवित चौथे स्थान मिळविले. सुरुवातीला रुद्रांक्षने आघाडीचे स्थान मिळविले होते. पण त्यानंतर त्याला ते राखता आले नाही. या क्रीडाप्रकारात चीनच्या तीन स्पर्धकांनी मानांकन फेरीत दर्जेदार कामगिरी करत आपले वर्चस्व शेवटपर्यंत राखले. चीनच्या शेंग लीहाओने 264.2 गुण शेवटच्या फेरीत नोंदवित सुवर्णपदक मिळविले. चीनच्या युटिंगने 263.3 गुणांसह रौप्यपदक पटकाविले. तर रुद्रांक्ष पाटीलने 262.3 गुणांसह कांस्यपदक मिळविले.
महिलांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत भारताच्या रमिताला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. रमिताने 632.3 गुण नोंदविले. पदकफेरीमध्ये आघाडीच्या आठ नेमबाजांमध्ये चीन आणि अमेरिकेचे प्रत्येकी 2 तसेच रुमानिया, इस्त्रायल आणि कझाकस्तान यांचे प्रत्येकी 1 तर यजमान भारताच्या एका स्पर्धकाचा समावेश होता. चीनच्या हुवांग युटिंगने 632.8 गुणांसह पात्रफेरीत आघाडीचे स्थान मिळविले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या युटिंगने अमेरिकेच्या मेरी टकेरला मागे टाकले. चीनच्या हुवांगने 265.7 गुणांसह सुवर्ण तर अमेरिकेच्या मेरी टकेरने 261.2 गुणांसह रौप्य तसेच कझाकस्तानच्या लि ने 261.2 गुणांसह कांस्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात भारताच्या रमिताने 260.5 गुण मिळविल्याने तिचे कांस्यपदक हुकले आणि तिला चौथ्या स्थानावर समाधान मानवे लागले.









