उपांत्य फेरीत थायलंडच्या कुनलावतकडून पराभूत
वृत्तसंस्था/ कोपनहेगन
येथे सुरु असलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या एचएस प्रणॉयला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात प्रणॉयला थायलंडच्या कुनलावतने 21-18, 13-21, 14-21 असे नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीतील पहिला गेम चांगलाच चूरशीचा झाला. 24 मिनिटे चाललेल्या या गेममध्ये प्रणॉयने त्याच्या आक्रमक खेळासह वर्चस्व ठेवले. त्यामुळे त्याने पहिला गेम त्याने 21-18 असा जिंकला. मात्र, कुनलावतने दुसऱ्या गेममध्ये दमदार पुनरागमन केले आणि 21-13 असा विजय मिळवत सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना निर्णयक तिसऱ्या गेममध्ये गेला. तिसऱ्या गेममध्ये कुनलावतने त्याची लय कायम ठेवली. त्यामुळे त्याला प्रणॉयला पराभूत करणे सोपे गेले. तिसरा गेम कुनलावतने 14-21 असा जिंकत सामनाही जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
संघर्षानंतरही पराभूत
रोमांचक झालेल्या या सामन्यात प्रणॉयने पहिला गेम जिंकत शानदार सुरुवात केली होती. पण दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये त्याच्याकडून चुका झाल्या, याचा फटका त्याला बसला. दरम्यान, प्रणॉयने उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा खेळाडू व्हिक्टर अॅक्सलसेनला नमवण्याची किमया साधली होती.
जागतिक पदक मिळवणारा पाचवा भारतीय
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पदक मिळवणारा प्रणॉय पाचवा पुरुष खेळाडू ठरला. यापूर्वी प्रकाश पदुकोण, बी. साई प्रणित, लक्ष्य सेन हे कांस्य, तर किदम्बी श्रीकांत रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. प्रणॉयच्या कामगिरीने 2011 पासून स्पर्धेत एक तरी पदक जिंकण्याची मालिका कायम राहिली. भारताकडून महिला विभागात सिंधूने एका सुवर्णपदकासह (2019) पाच, तर सायना नेहवालने दोन पदके मिळवली आहेत. याशिवाय, महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी 2011 मध्ये कांस्य तर गतवर्षी चिराग शेट्टी व सात्विकसाईराज यांनी कांस्यपदक जिंकले होते.
विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये प्रणॉयने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. प्रणॉयचे यश युवा पिढीसाठी प्रेयणादायी आहे. कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी









