वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियातील जेचॉन येथे सुरु असलेल्या 12 व्या वरिष्ठ महिलांच्या आशियाई जिमनॅस्टीक चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला जिमनॅस्ट प्रणाती नायकने जिमनॅस्टच्या व्हॉल्ट प्रकारात कांस्यपदक पटकाविले.
या स्पर्धेत 30 वर्षीय प्रणातीने व्हॉल्ट प्रकारात 13.466 गुणासह तिसरे स्थान घेत कांस्यपदकाची मानकरी ठरली. या क्रीडा प्रकारात चीनच्या झेंगने 13.650 गुणासह सुवर्ण तर व्हिएतमानच्या नेगुएनने 13.583 गुणासह रौप्यपदक पटकाविले. गेल्या मार्चमध्ये तुर्कीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टीक विश्वचषक स्पर्धेत प्रणाती नायकने कांस्यपदक घेतले होते. दक्षिण कोरियातील स्पर्धेत सहभागी झालेली भारताची महिला जिमनॅस्ट पी. समंथाचे पदक थोडक्यात हुकले. तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आंतरखंडीय जिमनॅस्टीक स्पर्धेत प्रणाती नायकने आतापर्यंत 3 पदके मिळवली असून तिने भारताची अनुभवी आणि ज्येष्ठ महिला जिमनॅस्ट दीपा कर्माकरला मागे टाकले आहे. दीपाने आंतरखंडीय स्पर्धेत 2 पदके मिळवली आहेत.









