वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेट या क्रीडा प्रकारात न्यूझीलंडच्या महिला संघाने कांस्यपदक मिळविले. तिसऱया स्थानासाठी झालेल्या प्ले ऑफ लढतीमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडचा 8 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकात 9 बाद 110 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 11.5 षटकात 2 बाद 111 धावा जमवित इंग्लंडचा दणदणीत पराभव करत कांस्यपदक पटकाविले.
इंग्लंडच्या डावात केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. कर्णधार स्किक्हेरने 19 चेंडूत 5 चौकारासह 27, ऍमि जोन्सने 32 चेंडूत 2 चौकारासह 26 तर इक्लेस्टोनने 21 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे जेनसेनने 3, तर जोनास आणि डेव्हाईन यांनी प्रत्येकी 2, रोवे व केर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात सलामीची फलंदाज आणि कर्णधार सोफी डेव्हाईनने नाबाद अर्धशतक झळकविले. तिने 40 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह नाबाद 51, बेटस्ने 10 चेंडूत 4 चौकारासह 20, प्लिमेरने 1 चौकारासह 4 तर ऍमिलिया केरने 15 चेंडूत 3 चौकारासह नाबाद 21 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 1 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. डेव्हाईन आणि बेटस्ने यांनी सलामीच्या गडय़ासाठी 4.3 षटकात 54 धावांची भागीदारी केली. इंग्लंडतर्फे स्किक्हेर आणि केम्प यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः इंग्लंड 20 षटकात 9 बाद 110 (स्किक्हेर 27, जोन्स 26, इक्लेस्टोन 18, जेनसेन 3-24, जोनास 2-22, डेव्हाईन 2-11, रोवे, केर प्रत्येकी एक बळी), न्यूझीलंड 11.5 षटकात 2 बाद 111 (डेव्हाइंन नाबाद 51, बेटस् 20, प्लिमेर 4, केर नाबाद 21, स्किक्हेर, केम्प प्रत्येकी एक बळी).









