वृत्तसंस्था/ जोहोर बेहरू (मलेशिया)
सुलतान ऑफ जोहोर चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत येथे झालेल्या कास्य पदकासाठीच्या लढतीत. भारतीय पुरूष हॉकी संघाने पाकिस्तानचा सडन डेथमध्ये 6-5 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे भारतीय हॉकी संघाला कास्यपदकावर समाधान मानावे लागले.
या सामन्यात निर्धारीतवेळेपर्यंत दोन्ही संघ 3-3 असे बरोबरीत राहिल्याने पंचानी पेनल्टी शुटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शुटआऊटमध्ये पुन्हा दोन्ही संघ बरोबरीत राहिल्याने ही कोंडी फोडण्यासाठी पंचानी सडनडेथचा अवलंब केला. निर्धारत वेळेमध्ये भारतातर्फे अरूण सहानीने 11 व्या मिनिटाला, पुवण्णाने 42 व्या मिनिटाला तर कर्णधार उत्तम सिंगने 52 व्या मिनिटाला गोल केले. त्यानंतर पाकतर्फे सुफियान खानने 33 व्या, अब्दुल कयुमने 50 व्या तर कर्णधार शाहीद हेनानने 57 व्या मिनिटाला गोल केले. पेनल्टी शुटआऊटमध्ये पुन्हा उभयसंघ बरोबरीत राहिले. पेनल्टी शुटआऊटमध्ये पाकतर्फे अर्षद लियाकत, अब्दुल रेहमान आणि अस्लम यानी तर भारतातर्फे विष्णुकांत सिंग, राजेंदर सिंग, अंगड वीरसिंग आणि उत्तम सिंग यांनी गोल केले. सडनडेथमध्ये विष्णुकांत सिंग आणि पाकच्या अर्षद लिकायत यानी गोल केले. गोलरक्षक मोहितने पाकच्या हनानचा फटका अडवित भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.









