वृत्तसंस्था / विनीपेग (कॅनडा)
येथे सुरू असलेल्या 18 वर्षांखालील वयोगटाच्या विश्व युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला रिकर्व्ह संघाने कांस्यपदक पटकाविले. या स्पर्धेत पहिलांच्या 18 वर्षांखालील वयोगटातील झालेल्या कांस्यपदकासाठी लढतीच्या सांघिक महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात भारताच्या गाथा आनंदराव खडके, जिआना कुमार, शर्वरी सोमनाथ शेंडे यांनी अमेरिका संघाचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत कांस्यपदक मिळविले. चौथ्या मानांकीत भारतीय महिला रिकर्व्ह संघाला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीत भारताने मेक्सीकोचे आव्हान 6-0 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने जपानवर 5-3 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. मात्र उपांत्य लढतीत प्रजासत्ताक कोरियाने भारतावर 6-2 अशी मात करत अंतिम फेरीत स्थान मिळविले.
या स्पर्धेत भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाला कांस्यपदकाच्या सामन्यात तुर्कीने 3-5 असे पराभूत केले. आता पुरुषांच्या 21 वर्षांखालील वयोगटात कंपाऊंड तिरंदाजीमध्ये भारताला आणखी काही पदकांची संधी आहे. या गटात भारतीय पुरुष कंपाऊंड संघाचा सामना जर्मनीबरोबर होत आहे. 2023 साली आर्यंलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी 6 सुवर्णपदकांसह एकूण 11 पदकांची कमाई केली होती.









