विश्वचषक तिरंदाजी स्टेज 3 : पुरुष संघाने मिळवून दिले तिसरे पदक
वृत्तसंस्था / मेडेलिन, कोलंबिया
येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 3 स्पर्धेत भारताच्या पुरुष रिकर्व्ह संघाने चीनचा पराभव करून तिसरे कांस्यपदक मिळवून दिले.
चौथ्या मानांकित तुषार शेळके, मृणाल चौहान, धीरज बोम्मदेवरा यांनी कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या यांगा केयांग लि मेंगकी व वांग यान यांच्यावर 5-3 (58-54, 55-56, 54-53, 56-56) अशी मात करीत पुरुषांच्या सांघिक रिकर्व्हचे कांस्य मिळविले.
महिलांमध्ये भजन कौर, संगीता व तनिशा यांना या स्पर्धेत सातवे मानांकन मिळाले होते. मात्र त्यांना दुसऱ्याच फेरीत फ्रान्स संघाकडून 3-5 (52-51, 53-54, 49-55, 52-52) असा पराभव स्वीकारावा लागला. याआधी भारताने पुरुष व महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात एकेक कांस्यपदक मिळविले आहे.
तत्पूर्वी, पात्रता फेरीत युवा तिरंदाज भजन कौरने महिला रिकर्व्हमध्ये टॉप टेनमध्ये स्थान मिळविले होते. कोरियन तिरंदाजांनी वर्चस्व गाजविलेल्या या फेरीत भजनने 668 गुण नोंदवत नववे स्थान मिळविले. संगीता (651), तनिशा वर्मा (648) यांनी मात्र पात्रता फेरीत 30 व 36 वे स्थान मिळविले होते. शांघायमध्ये सुवर्ण मिळविलेल्या लिम सिहयेऑनने (684) सुवर्ण व तिच्याच सहकाऱ्यांनी दुसरे व तिसरे स्थान मिळवित 72 तीरांच्या 70 मीटर फेरीत क्लीन स्वीप साधले.
पुरुष विभागात भारतातर्फे शेळकेने सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 671 गुण घेत 16 वे स्थान घेतले. कोरियाच्या खेळाडूंनी तीनही पदके पटकावत क्लीन स्वीप साधले. त्यांच्या किम वूजिनने 696 गुण नोंदवत सुवर्ण, ली वू सेओकने रौप्य व किम जे देओकने कांस्यपदक मिळविले. भारताच्या चौहानने 670 गुण घेत 20 वे, धीरजने 669 गुण घेत 23 वे स्थान मिळविले. पुरुषांच्या रिकर्व्ह मानांकनात भारताला चौथे स्थान मिळाले असून टॉप सीडेड कोरियाविरुद्ध त्यांची उपांत्य लढत होऊ शकते.









