वृत्तसंस्था/ चेंगडू
येथे सुरू असलेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला धावपटूनी 20 कि. मी. सांघिक चालण्याच्या शर्यतीत शनिवारी कास्यपदक पटकावले. या स्पर्धेमध्ये भारतीय अॅथलिट्सची कामगिरी आतापर्यंत दर्जेदार झाली आहे. या स्पर्धेत महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत ज्योती येराजीने कास्यपदक तर त्यानंतर पुरुषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत अमलान बोर्गोहेनने कास्यपदक मिळवले.
शनिवारी झालेल्या महिलांच्या सांघिक 20 कि. मी. चालण्याच्या शर्यतीत भारताच्या पूजा कुमावत, निकिता लांबा, मानसी नेगी आणि प्रियांका यांनी 5 तास 12 मिनिटे 13 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक पटकावले. या क्रीडा प्रकारात चीनने 4 तास 52 मिनिटे 02 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर स्लोव्हाकियाच्या धावपटूंनी 5 तास 05 मिनिटे 36 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक मिळवले.
भारताच्या ज्योती येराझीने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या 100 मी. अडथळ्यांच्या शर्यतीत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर तिने विश्व विद्यापीठ स्पर्धेत तिने या क्रीडा प्रकारात कास्यपदक मिळवून आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे. ज्योती येराजी आणि बोर्गोहेन यांच्या या कामगिरीमुळे भारतीय अॅथलेटिक्स क्षेत्रातील अॅथलिट्सना अधिक प्रोत्साहन आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.









