वृत्तसंस्था/ कुवेत सिटी
आशिया ऑलिम्पिक पात्र फेरीच्या शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रायझा धिल्लन आणि गुरज्योत खंगुरा या जोडीने स्किट मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात कांस्यपदक मिळविले. 19 वर्षीय रायझा धिल्लनने या स्पर्धेत आतापर्यंत 3 पदके मिळविली आहेत.
मिश्र सांघिक स्किट नेमबाजीत रायझा आणि गुरजोत यांनी कुवेतच्या अब्दुल्ला आणि इमान शामा यांचा 41-39 अशा गुणांनी पराभव केला. शनिवारी या स्पर्धेत रायझा धिल्लनने महिलांच्या स्किट वैयक्तिक नेमबाजी प्रकारात रौप्यपदक मिळवून पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिट निश्चित केले आहे. रायझा धिल्लनने या स्पर्धेत महिलांच्या सांघिक स्किट नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक मिळविले आहे. या स्पर्धेच्या अखेरीस भारताने 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्यपदकांसह एकूण 8 पदकांची कमाई करत पदक तक्त्यात चौथे स्थान मिळविले.









