वृत्तसंस्था/ हांगझाऊ (चीन)
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शनिवारी भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदक पटकाविले. महिला हॉकी या क्रीडा प्रकारात झालेल्या कांस्यपदकासाठीच्या लढतीत भारताने विद्यमान विजेत्या जपानचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे भारतीय महिला संघाला या क्रीडा प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
2018 च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत जपानने भारताचा 1-0 असा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड सविता पुनियाच्या भारतीय संघाने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत केली. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारतीय महिला संघाचे हे सातवे पदक असून त्यांचे हे चौथे कांस्यपदक आहे. शनिवारच्या सामन्यात पाचव्या मिनिटाला दिपीकाने पेनल्टी स्ट्रोकवर भारताचे खाते उघडले. 30 व्या मिनिटाला युरी नेगाईने जपानला बरोबरी साधून दिली. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना सुशिला चानुने भारताचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदवित जपानचे आव्हान संपुष्टात आणले. या क्रीडा प्रकारात गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान चीनने भारताचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला होता.









