क्रिकेटर्सच्या फिटनेससाठी बीसीसीआयचा नवा फंडा : जलदगती गोलंदाजांसाठी ठरणार फायदेशीर
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय क्रिकेटपटूंचा फिटनेस आणखी चांगली रहावा यासाठी रग्बी खेळाडूंसाठी वापरण्यात येणारी ब्रॉन्को टेस्ट करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. खेळाडूंना फिटनेस सिद्ध करण्यासाठी यो यो टेस्टचा टप्पा पार करावा लागतो. त्यात आता बीसीसीआयने क्रिकेटर्सच्या फिटनेससाठी नवा फंडा आजमावण्याचाही निर्णय घेतला आहे. या नव्या फिटनेस फॉर्म्युलानुसार, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला आता रग्बी सेंट्रिक ब्रॉन्को टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघाचे स्ट्रेंथ अँण्ड कंडीशनिंग कोच एड्रियन ले रूक्स यांनी याबाबतची माहिती दिली.
भारतीय क्रिकेटपटूंनी उच्चस्तरीय फिटनेस राखावा आणि त्यांची एरोबिक क्षमता वाढावी यासाठी, रग्बीमधील ब्रॉन्को टेस्ट (20 मी., 40 मी. आणि 60 मी. अशी शटल रन) सुरू करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजांनी जिममध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा धावण्यावर भर द्यायला हवा. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील या मताशी सहमत आहेत. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या मालिकेदरम्यान काही वेगवान गोलंदाजांचा फिटनेस अपेक्षेप्रमाणे नसल्याचे दिसून आलं. मोहम्मद सिराज हा एकमेव गोलंदाज मात्र प्रत्येक सामन्यात खेळला. काही मोठ्या खेळाडूंनी आधीच बंगळूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ब्रॉन्को टेस्ट दिली आहे. क्रिकेटपटू यो यो टेस्ट आणि 2 किमी टाइम-ट्रायल अशा फिटनेस टेस्ट पूर्वीपासूनच देत आले आहेत. आता, यामध्ये या नव्या टेस्टची भर पडली आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयकडून लवकरच देशांतर्गत क्रिकेटमध्येही ही टेस्ट लवकरच लागू करण्याचे संकेत दिले आहेत.
ब्रॉन्को टेस्ट नेमकी कशी असते
ब्रॉन्को टेस्टची फिटनेस पातळी ही रग्बी खेळाशी संबंधित असून खेळाडूंची फिटनेस पातळी आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी ही चाचणी लागू केली गेली आहे. या टेस्टमध्ये, प्रथम 20 मीटर, नंतर 40 मीटर आणि 60 मीटर असे धावावे लागते. असा हा एक सेट्स असतो. खेळाडूला असे पाच सेट्स पूर्ण करावे लागतात. यानुसार खेळाडूला न विश्रांती घेता 1200 मीटर धावावे लागते. विशेष म्हणजे, भारतीय खेळाडूंना सहा मिनिटांत ब्रॉन्को टेस्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. अर्थात, कमी वेळेत सतत धावणे हा भाग ही सेट अधिक कठीण बनवते. ही चाचणी विशेषत: वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर मानली जात आहे. खेळाडू मैदानापेक्षा जिममध्ये जास्त वेळ घालवत असतात. जिमपेक्षा मैदानावर धावणे हे अधिक चांगले आहे. म्हणूनच या चाचणीला पुढे आणण्यात आले आहे.
तंदुरुस्तीवर विशेष लक्ष
या चाचणीमुळे भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. विशेषत: जलदगती गोलंदाजांच्या शारीरिक क्षमतेवर याचा सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या या पावलामुळे भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सक्षमपणे कामगिरी करेल, अशी आशा आहे.









