वॉटर स्पोर्ट्सवाल्यांकडून पर्यटकांची जबरी लूट ; शॅकधारकांकडून खाटा, झोपड्यांची अतिक्रमणे,पर्यटनमंत्री रोहन खंवटे कळंगूटला ‘अॅक्शन मोड’ मध्ये

म्हापसा : पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल रविवारी संध्याकाळी 5 वा. कळंगूट ते बागा दरम्यान किनाऱ्याची पाहणी केल्यांनतर संताप व्यक्त केला. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना लुबाडणारे वॉटर स्पोर्टसचे एजंट, तसेच दलालीचा किळसवाणा खुलेआम व्यवहारही त्यांनी पाहिला. समुद्र किनाऱ्यावरील वाढती अतिक्रमणे, भरतीरेषेपासून अवघ्या 10 मीटरच्या अंतरावर लावलेल्या खाटी तसेच इतर वस्तू त्वरित हटवाव्यात, असा आदेश मंत्र्यांनी पर्यटन खात्याच्या संचालकाना दिला आहे. कळंगूट पंचायत मंडळ या अतिक्रमणांवर हरकत का घेत नाही, असा सवाल कळंगूटचे सरंपच जोसेफ सिक्वेरा यांना त्यांनी विचारला.
कळंगूट पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत, पर्यटन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. सर्वत्र अतिक्रमणे, दलाल, लमाणी, कुत्र्यांचा वाढता उच्छाद असे हे सारे गलिच्छ वातावरणात पर्यटकांना आनंद कसा मिळणार, असा सवाल पर्यटनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
शॅकधारकांची अतिक्रमणे
समुद्र भरतीरेषपासून अवघ्या दहा मीटर अंतरावर शॅकधारकांनी लावलेल्या खाटांचा प्रकार पाहून मंत्री संतापले. किनाऱ्यावर भरतीरेषेपासून पंधरा मिटरच्या अंतरावर पर्यटन खात्याची हद्द निश्चित केली आहे. तिचे उल्लंघन करीत शॅकधारकांनी शॅकचे अतिक्रमण केले आहे. हे सर्व बेकायदशीर असल्याचे मंत्र्यांनी संबंधितांना सुनावले.
वॉटर स्पोर्ट्सवाल्यांकडून लूट
वास्तविक या ठिकाणी कोणतीही गैरकृत्ये घडत नसल्याचे आपल्याला सांगण्यात येत होते. मात्र आपण आज याठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता वॉटर स्पोर्टस्चे बोटचालक पर्यटकांना लुबाडत असल्याचा अनुभव आला. केवळ 800 रुपयांच्या ठिकाणी पर्यटकांकडून तब्बल तीन हजार रुपये उकळले जातात. तशी तक्रारही आपल्याकडे पर्यटकांकडून आली आहे, असे पत्रकारांशी बोलताना मंत्री खंवटे यांनी सागितले. हे प्रकार थांबविण्याची स्पष्ट सूचना पोलिसांना व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिली.
मंत्री, पोलिसांसमोरच दलालीचे प्रकार
मंत्री रोहन खंवटे तपासणीसाठी कळंगूट किनारी आले असता त्यांना येथील परिस्थितीचा वाईट अनुभव आला. येथे काही दलाल फिरत असल्याचे त्यांनी पाहिले. मात्र मंत्र्यांना, व त्यांच्यासोबत पोलिसांना, अधिकाऱ्यांना पाहून त्या दलालांनी तेथून पळ काढला. पोलिसांच्या समक्षच दलालीची कृत्ये दिसल्यामुळे पोलिसांनीही शरमेने मान खाली घातली. हा दलालीचा प्रकार त्वरित बंद करण्याबाबत योग्यती कारवाई करण्याचा आदेश मंत्री खंवटे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
मंत्री खंवटे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, या किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. येथे जो दलालीचा किळसवाणा प्रकार चालला आहे, तो त्वरित बंद करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.
अतिक्रमण विरोधात कडक मोहीम
खासगी शॅकवाल्यांनी समुद्रकिनाऱ्याच्या जवळ खाटा घातलेल्या दिसत आहेत. त्यामुळे याठिकाणी येणारे चांगले पर्यटक दूर जातात. यापूर्वी खात्याने येथील जमिनीचा सर्व्हे करून खांबे उभारुन हद्द निश्चित केली आहे. त्या भागात अतिक्रमण झाल्यास त्यावर कडक कारवाई करून हटविण्याबाबत कोणतीही हयगय करणार नाही, असा इशारा मंत्री रोहन खंवटे यांनी यावेळी दिला. आमदार मायकल लोबो व सरंपच जोसेफ सिक्वेराही अतिक्रमणाच्या विरोधात आहेत. अशा प्रकारचे अतिक्रमण झाल्यास पर्यटक किनाऱ्याचा आनंद घेऊ शकत नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
चोवीस तासांत अतिक्रमण हटवा
शॅकधारकांनी एका ठिकाणी परवानगी घेऊन शॅक उभारले व दुसऱ्याच ठिकाणी खाटा घातल्याचे चित्र दिसत आहे. याचा अहवाल मंत्री खंवटे यांनी मागवला असून संबंधित सर्व शॅकधारकानी स्वत:हून 24 तासात हे अतिक्रमण हटवावे, अन्यथा खात्याकडून ते अतिक्रमण हटविण्यात येईल, असा इशाराही मंत्र्यांनी यावेळी दिला.
कुत्र्यांचा बंदोबस्त पंचायतीने करावा
मंत्री खंवटे कळंगूट किनाऱ्यावर गाडीने पाहणी करत असताना गाडीच्या मागे कुत्रे लागल्याचा वाईट अनुभवही त्यांना आला. हे कुत्रे पर्यटकांना चावू शकतात, त्यामुळे त्यांचा बंदोबस्त कळंगूट पंचायतीने करणे आवश्यक आहे. त्यांनी त्वरित यावर कारवाई करावी असा आदेश खंवटे यांनी दिला. त्याचबरोबर किनाऱ्यावरील शॅक्सच्या मागे खूप झोपड्या झाल्या असून तेथे सामान ठेवण्यात येत आहे. तेथे आग लागून मोठी नुकसानी होऊ शकते, त्यामुळे ते काढून टाकावे. एका हॉटेल चालकाने पर्यटन खात्याच्या जागेवरच अतिक्रमण केले आहे ते त्वरित हटवावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशाराच मंत्र्यांनी दिला.
मुख्यमंत्री पर्यटनाबाबत गंभीर
पर्यटकांची होणारी लुबाडणूक, रात्रीच्या बेकायदेशीर पार्ट्या त्वरित बंद करा. पंचायतीने पर्यटन खात्याच्या कर्मचाऱ्यांना, पोलिसांना सहकार्य करावे. आपणही आपला पाहणी दौरा असाच अधूनमधून सुऊच ठेवणार आहे. मुख्यमंत्री स्वत: पर्यटनाबाबत खूप गंभीर आहेत. त्यांना बेकायदेशीर काही नको आहे, सर्व काही कायद्यानुसार व्हावे आणि स्वच्छ, सुंदर किनारे पर्यटकांना बघता यावे हा त्यांचा मानस आहे, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
मंत्री खंवटे यांची बुलेट स्वारी

मंत्री रोहन खंवटे यांनी कळंगूटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांची बुलेट स्वत: चालवत कळंगूट भागाची पाहणी केली. सरपंच सिक्वेराही त्यांच्यामागे बसून माहिती देत होते. यात त्यांना येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचाही अनुभव आला. नंतर ते कळंगूट क्रीडा मैदावनावर गेले. तेथून ते पर्वरीला रवाना झाले.









