जांभई, शिंक, खोकला यांच्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तथापि, काहीवेळा अत्यंत साध्या वाटणाऱ्या या शारिरीक क्रिया जीवघेण्याही ठरु शकतात. जांभई जोरात आली, तर काहीवेळा नंतर लवकर तोंड मिटत नाही किंवा आपल्या चेहऱ्याची हाडे दुखावली जातात, असा अनुभव अनेकांना येतो. पण यापलिकडे फारसे काही होत नाही. तथापि, ब्रिटनमधील कॅनी ब्लॅक या महिलेला जोराच्या जांभईमुळे आपला जीव गमावण्याची वेळ आली होती. नुकतीच घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय झाली आहे. या बाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्या आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी आळोखेपिळोखे दिले. याचवेळी त्यांना जांभई आली. ती इतकी जोरात आली, की तिच्या ताणाने अक्षरश: त्यांची मान मोडली. जांभई देताना प्रथम त्यांना वीजेचा शॉक बसल्यासारखे झाले. नंतर त्यांचा हात लुळा पडल्याची त्यांचा जाणीव झाली. त्यामुळे त्या प्रचंड घाबरुन गेल्या होत्या.
मानेत असह्या वेदना होऊ लागल्याने त्यांना डॉक्टरकडे जावे लागले. तपासणी केल्यानंतर त्यांच्या मानेचे हाड मोडल्याचे निदान करण्यात आले. तसेच, तातडीने शस्त्रक्रिया करुन घेण्याचा त्यांना सल्ला देण्यात आला. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. तथापि, त्यांच्या मज्जासंस्थेची स्थायी स्वरुपाची हानी झाली आहे. शस्त्रक्रियेने त्यांचा जीव वाचला असला, तरी पुढचे सारे आयुष्य त्यांना परावलंबी स्थितीत काढावे लागणार आहे. तसेच औषधे घेतल्याशिवाय चालता येणे त्यांना अशक्य झाले आहे. जांभईमुळे मान मोडणे, ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचे त्यांच्या डॉक्टरांचे मत आहे. ही घटना खरोखरच आश्चर्यकारक अशीच आहे. कालांतराने कदाचित त्यांची प्रकृती सुधारेल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, यासाठी किती दिवस लागतील, हे निश्च्ति नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.









