अनोखी लव्हस्टोरी व्हायरल
खरं प्रेम सुदैवी लोकांनाच मिळते असे बोलले जाते. परंतु प्रेम तुम्हाला कुठेही लाभू शकते यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. प्रेम एखाद्या सुंदर ठिकाणीच मिळेल हे आवश्यक नाही. अनेकदा प्रेम एखाद्या दुर्घटनेच्या ठिकाणी मिळू शकते. चीनमध्ये एका जोडप्यासोबत काही असेच घडले आहे. त्यांची लव्हस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चीनच्या हुनान प्रांतात राहणारा 36 वर्षीय ली आणि 23 वर्षीय महिलेची लव्हस्टोरी एका कार दुर्घटनेनंतर सुरू झाली आणि आता दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत.
डिसेंबर 2023 मध्ये ली भरधाव वेगाने कार चालवत होता, याचदरम्यान त्याच्या कारची धडक इलेक्ट्रिक सायकल चालविणाऱ्या महिलेला बसली, दुर्घटनेत महिलेला कॉलरबोन फ्रॅक्चर झाले, परंतु लीने माफी मागितल्यावर तिने हसत प्रतिसाद दिला.लीला या महिलेच्या मनाच्या मोठेपणाने प्रभावित केले. तिच्या आईवडिलांनी देखील ली याला दुर्घटनेसाठी जबाबदार ठरविले नाही. तसेच कुठलीच भरपाई मागितली नाही. याच्या बदल्यात लीने रुग्णालयात दरदिनी तिची देखभाल केली. यादरम्यान दोघांमध्ये दृढ मैत्री झाली आणि महिलेने तीन आठवड्यांनी स्वत:च्या प्रेमाची कबुली दिली.
प्रथम नकार, मग होकार
लीने प्रारंभी वयाच्या अंतराचा दाखला देत हे नाते पुढे नेण्यास नकार दिला. परंतु महिलेने तुझे ऋण फेडण्यासाठी कमीतकमी एक मूव्ही डेट तर व्हायलाच हवी अशी गळ घातली, मग ली याकरता मान्य झाला. चालू महिन्यात दोघांनी विवाह केला आहे.
लीवर होते कर्ज
ली सेल्समन आणि बिझनेसमन आहे. परंतु तो कर्जात बुडाला होता. त्याच्या पत्नीने विवाहात 1 लाख 88 हजार युआनचा हुंडा स्वीकारण्यास नकार दिला आणि हा पैसा बिझनेस वाढविण्यास खर्च करण्यास सांगितले. दोन महिन्यात माझे 6 अपघात झाले होते. परंतु या घटनेनंतर माझ्यासोबत अन्य कुठलाही अपघात झाला नसल्याचे लीने सांगितले. चीनमध्ये हुंड्याची प्रथा भारताच्या उलट आहे. तेथे सर्वसाधारणपणे वराचा परिवार युवतीच्या परिवाराला हुंडा देतो. याला ब्राइड प्राइस किंवा कॅओली म्हटले जाते.









