रंग काळा असेल, उंची कमी असेल किंवा डोळ्यांमध्ये काही समस्या असेल तरी अशा बाबी सहन केल्या जातात, हे आपल्याला माहीत आहे. तथापि, एकाद्या व्यक्तीच्या डोक्याचा आकार थोडासा अनोखा किंवा नेहमीसारखा नसेल तर अशा व्यक्तीकडे विचित्र दृष्टीने पाहिले जाते. याचा त्या व्यक्तीला मोठा ताप होतो. इतर वैगुण्ये बाह्या उपचार करुन झाकली जाऊ शकतात. पण डोक्याचा आकार बदलणार कसा ? ब्रिटनमधील केल्सी नामक महिलेने हा त्रास बरेच वर्षे सहन केला. तिचे डोके इतके रुंद होते, की ती निम्मी टकलू दिसत असे. त्यामुळे तिचे बरेच हसे होत असे. पण तिला यावर कोणताच उपाय सापडत नव्हता.
अखेर निर्धार करुन तिने एक उपाय केला. यासाठी तिला लक्षावधी रुपये खर्च करावे लागले. तिने आपल्या डोक्यावर घनदाट केसांचे रोपण करुन घेतले. ही प्रक्रिया बरीच जटील आणि महागडी असते. तसेच काहीशी यातनादायीही असते. पण तिने हा त्रास आनंदाने सहन केला. कारण, तिला लोकांच्या चेष्टेपासून मुक्ती हवी होती. अखेर तिच्या मनासारखे झाले होते. तिच्या डोक्याचा रुंद आकार आणि त्यामुळे आलेला टकलूपणा दाट केसांमुळे झाकला गेला होता. तिची मुख्य समस्या सुटली होती. तिने ही सर्व माहिती इंटरनेटवर लोकांसाठी पोस्ट केली आहे.
तसा हा उपाय नवा नाही. केसांचे रोपण गेल्या कित्येक वर्षांपासून केले जात आहे. तथापि, हा उपाय प्रामुख्याने पुरुषांसाठी आहे. डोक्यावरचे केस गेल्याने टक्कल पडलेले पुरुष केसांचे रोपण करुन ही समस्या दूर करतात. पण महिला हा उपाय सहसा करत नाहीत. पण केल्सीने हा उपाय करण्याचे धाडस दाखविले. तिला त्याचे फळही योग्य मिळाले. तिची समस्या आता सुटली आहे.









