नाव अन् छायाचित्र जारी : ब्रिटनने फेटाळला आरोप
वृत्तसंस्था/ लंडन
पंजाब पोलिसांनी अलिकडेच खलिस्तानी दहशतवादी मॉड्यूलसंबंधी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांना खलिस्तान जिंदाबाद फोर्सचा (केझेडएफ) प्रमुख आणि पाकिस्तानात राहत असलेला रणजीत सिंह नीताकडून नियंत्रित दहशतवादी मॉड्यूलच्या तपासादरम्यान एका ब्रिटिश सैनिकाविषयी सुगावा लागला आहे. पोलीस स्थानकांवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यांमागे ब्रिटिश शीख सैनिकाचा हात असल्याचा संशय आहे. ब्रिटिश सैन्यात सैनिक असलेल्या जगजीत सिंहचा दहशतवादात सहभाग असल्याचा आरोप होतोय. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने हे आरोप फेटाळले आहेत. या नावाचा कुठलाही इसम ब्रिटिश सैन्यात कार्यरत नसल्याचा दावा करण्यात आला. तर पंजाब पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी हे प्रकरण ब्रिटिश अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले जाणार असल्याचे सांगितले आहे.
पंजाब पोलिसांच्या डोजियरनुसार जगजीत सिंह आणि त्याचे सहकारी पंजाबमध्ये सांप्रदायिक सौहार्द बिघडविण्यासाठी धार्मिक संप्रदायांच्या प्रमुखांना लक्ष्य करण्याचा कट रचत होते. जगजीत सिंहने युवांना पैसे अन् विदेशात पलायनाचे प्रलोभन देत दहशतवादी कारवायांसाठी भरती करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून जगजीत सिंहला वॉँटेड गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. 2021 मध्ये तरनतारन जिल्ह्यातील रहिवासी रंजीत सिंहला ग्रेनेड आणि पिस्तुलांसोबत अटक करण्यात आल्यावर जगजीत सिंहचे नाव समोर आले होते.
दहशतवादी संघटनांबद्दल खुलासा
मागील 3 महिन्यांमध्ये पंजाबमध्ये पोलीस स्थानक आणि अन्य ठिकाणी अनेक ग्रेनेड तसेच आयईडी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांची जबाबदारी केझेडएफचा प्रमुख रंजीत सिंह नीता अणि सर्व्हिलान्स अँड रिकॉनिसेंस युनिटच्या फतेह सिंह बागीने स्वीकारली आहे. 37 वर्षीय जगजीत सिंह मूळचा तरनतारन जिल्ह्यातील मियांपूर गावचा रहिवासी आहे. 2010 मध्ये विद्यार्थी व्हिसावर ब्रिटन येथे जात शिक्षण पूर्ण केल्यावर तो 2013 मध्ये ब्रिटिश सैन्यात सामील झाला होता. यानंतर त्याने खलिस्तान जिंदाबाद फोर्स आणि बब्बर खालसा इंटरनॅशनल यासारख्या दहशतवादी संघटनांसोबत संबंध प्रस्थापित केले.
ब्रिटिश मंत्रालयाचे उत्तर
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने पंजाब पोलिसांचे आरोप फेटाळत जगजीत सिंह नावाच कुठलाही इसम ब्रिटिश सैन्यात नसल्याचे म्हटले तसच भारतीय अधिकाऱ्यांनी यासंबंधी संपर्क साधला नसल्याचा दावा केला. पंजाब पोलिसांकडुन जारी छायाचित्र हे अन्य ब्रिटिश शीख सैनिकाचे असून त्याचे नाव जगजीत सिंह नाही असे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रियान शिल्लाबीर यांनी म्हटले आहे.









