आगामी काही दिवस ठिकठिकाणी पार्थिवाचे अंतिम दर्शन
@ लंडन / वृत्तसंस्था
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर 19 सप्टेंबरला अंत्यसंस्कार केले जातील. त्यांचे कुटुंबीय, राजकीय नेते आणि जगभरातील नेते स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 11 वाजता त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी एकत्र जमतील. या दिवशी ब्रिटनमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या अंत्यसंस्कारापूर्वी महाराणी एलिझाबेथ यांची अंत्ययात्रा रविवारी सुरू झाली. आगामी काही दिवस लोक त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊ शकतील. त्यानंतर राजकीय सन्मानासह त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
सर्वप्रथम महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पार्थिव शरीर स्कॉटलंडच्या बालमोरल किल्ल्याहून रवाना करण्यात आले. सोमवार, 12 सप्टेंबरपासून 24 तासांसाठी पार्थिव सेंट गिल्स कॅथेड्रल एडिनबरा येथे ठेवले जाईल. याप्रसंगी राजघराण्यातील सदस्यही कॅथेड्रल येथे पोहोचतील. मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी पार्थिव लंडन येथे आणले जाईल. या प्रवासादरम्यान त्यांची कन्या आणि राजकुमारी सोबत असेल. बुधवारी दुपारी साधारण 3 वाजता महाराणींचे पार्थिव वेस्टमिन्स्टर सभागृहात आणले जाईल. पार्थिवाची शवपेटी सभागृहात उंच व्यासपीठावर ठेवली जाईल. या व्यासपीठाच्या प्रत्येक कोपऱयात राजघराण्याची सेवा करणारे सेवक तैनात असतील. यानंतर 19 सप्टेंबरला संपूर्ण राजकीय सन्मानासह महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना अंतिम निरोप दिला जाईल.
भारताने रविवारी पाळला दुखवटा
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर रविवारी भारतात एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. दुखवटय़ामुळे शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यापर्यंत खाली उतरवण्यात आले होते. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या स्मृतीनिमित्त आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी देशात एक दिवसीय राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेल्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वषी निधन झाले आहे. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी एलिझाबेथ यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचे आप्तस्वकीय स्कॉटलंड येथील त्यांच्या बालमोरल या निवासस्थानी उपस्थित होते.









