बेंगळूर-लंडन प्रवासात लँडिंगदरम्यान घटना
लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटिश एअरवेजच्या विमानाला एका पक्ष्याची धडक बसण्याची दुर्घटना शनिवारी लंडनमध्ये घडली. सदर विमानामधून ‘किंग चार्ल्स-3’च्या पत्नी म्हणजेच राणी कन्सोर्ट कॅमिला यासुद्धा प्रवास करत होत्या. सुदैवाने या अपघातात विमानाचे मोठे नुकसान न झाल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. ब्रिटिश एअरवेजचे बोईंग 777-200ईआर हे विमान बेंगळूरहून लंडनला जात होते.
लंडनमधील विमानाच्या लँडिंगदरम्यान एका पक्ष्याची विमानावर जोरदार धडक बसल्यामुळे विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाले. वैमानिकाच्या हुशारीमुळे मोठी दुर्घटना टळली. पायलटने प्रसंगावधान राखत विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. त्यानंतर कॅमिला यांच्यासह इतर सर्व प्रवाशांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. बकिंघम पॅलेसने या घटनेवर भाष्य केलेले नसले तरी विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी दुर्घटना टळल्याची पुष्टी केली आहे. ब्रिटनच्या राणी कॅमिला सौक्या होलिस्टिक हेल्थ अँड वेलनेस सेंटरला भेट देण्यासाठी बेंगळूरमध्ये आल्या होत्या. त्यांचा हा 10 दिवसांचा दौरा होता.









