युवराज विलियम यांचे अफेयर असल्याचा संशय : केट यांच्यावर 2 महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनचे राजघराणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी प्रिन्सेसन ऑफ वेल्स केट मिडलटन यांच्यावरुन वाद उभा ठाकला आहे. जानेवारी महिन्यात केट यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हापासून त्या सार्वजनिक स्वरुपात दिसून आलेल्या नाहीत. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटल्यावर आता केट गायब झाल्या असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच सोशल मीडियावर हॅशटॅग व्हेयर इज केट ट्रेंड होतोय. याचदरम्यान प्रिन्स विलियम यांचे अफेयर सुरू असल्याचे बोलले जात आहे.
प्रिन्स विलियम यांचे मार्चियोनेस ऑफ चोलमोंडेली सारा रोज हॅनबरी यांच्यासोबत अफेयर असल्याचे काही जणांचे सांगणे आहे. हेनबरी या केट आणि विलियम यांच्या निकटवर्तीय आहे. विलियम आणि हेनबरी यांच्या अफेयरचा उल्लेख अमेरिकन शो ‘द ले नाइट शो’चे सूत्रसंचालक स्टिफिन कोलबर्ट यांनी केला आहे. विलियम यांच्या अफेयरमुळेच केट लोकांपासून अंतर राखत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे हैनबरी यांनी अफेयरचे वृत्त फेटाळले आहे.
बॉडी डबलचा वापर
18 मार्च रोजी एका ब्रिटिश वृत्तपत्राने केट आणि विलियम यांचे छायाचित्र प्रकाशित केले होते. यात दोघेही शॉपिंग करताना दिसून आले होते. परंतु छायाचित्रात दिसून येणारी महिला केट नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. छायाचित्रात केट यांची बॉडी डबल असल्याचा दावा करण्यात येत आहे.
वैद्यकीय स्थितीबद्दल उत्सुकता
राजघराण्याकडुन शस्त्रक्रियेनंतर केट यांचे कुठलेच नवे छायाचित्र जारी करण्यात आलेले नाही. शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झाल्याचा दावा देखील केला जात आहे. तर दुसरीकडे राजघराण्याने एक वक्तव्य जारी करत प्रिन्सेस यांची प्रकृती सुधारत असून ईस्टरनंतर त्या सार्वजनिक व्यासपीठांवर दिसून येतील असे नमूद केले आहे.
छायाचित्र हटविले
अलिकडेच केट मिडलटन यांनी एक छायाचित्र शेअर केले होते. यात त्या स्वत:च्या मुलांसमवेत दिसून आल्या होत्या. या छायाचित्रात फेरफार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याचमुळे बहुतांश वृत्तसंस्थांनी हे छायाचित्र स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरून हटविले होते.









