जय श्री रामचा दिला नारा : पंतप्रधान नव्हे हिंदू म्हणून आलोय
वृत्तसंस्था/ कॅम्ब्रिज
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे मोरारी बापू यांच्या रामकथेत सामील झाले आहेत. ही रामकथा ब्रिटनच्या कॅम्ब्रिज विद्यापीठात आयोजित झाली आहे. या रामकथेसाठी मी पंतप्रधान नव्हे तर हिंदू म्हणून सामील झालो आहे असे म्हणत सुनक यांनी जय श्री राम असा नाराही दिला आहे.
माझ्यासाठी धर्म अत्यंत व्यक्तिगत आहे. धर्म जीवनाच्या प्रत्येक पैलूत मला मार्ग दाखवून देतो. पंतप्रधान होणे सन्मानाची बाब आहे, परंतु हे काही सोपे काम नाही. या पदावर असताना कठिण निर्णय घ्यावे लागतात असे सुनक यांनी म्हटले आहे.
धर्म मला देशासाठी सर्वोत्तम कार्य करण्यासाठी साहस अन् प्रेरणा देतो. राम नेहमीच मला प्रेरणा देतात. जीवनातील आव्हानांना साहसाने सामोरे जाणे आणि विनम्रतेने शासन करणे तसेच निस्वार्थ भावनेने काम करणे राम शिकवत असल्याचे ऋषी सुनक म्हणाले.
चॅन्सेलर असताना दिपावलीवेळी 10 डाउनिंग स्ट्रीटबाहेर दीप प्रज्वलित करणे माझ्यासाठी अत्यंत खास क्षण होता. हिंदू असल्याचा आणि ब्रिटिश असण्याचा मला गर्व असल्याचे वक्तव्य सुनक यांनी केले आहे.
रामकथेदरम्यान सुनक यांनी स्वत:च्या बालपणाची आठवण सांगितली आहे. बालपणी मी स्थानिक मंदिरात जात असे. तेथे माझे कुटुंब होम, पूजा अन् आरतीत सामील व्हायचे. यानंतर मी माझ्या भावंडांसोबत प्रसादाचे वाटप करायचो. रामायणासोबत श्रीमद् भगवद्गीता तसेच हनुमान चालीसाचे मी पठण करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. माझ्या ऑफिसच्या टेबल भगवान गणेशाची मूर्ती ठेवली आहे. ही मूर्ती मला सातत्याने एखादे काम करण्यापूर्वी त्यावर विचार करण्याची आवश्यकता आठवून देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









