ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान सरकारी इमारतीमध्ये केलेल्या पार्ट्यांमुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागले. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री यासाठी मतदान झाले. या मतदानात जॉन्सन यांच्या समर्थनार्थ 211 तर विरोधात 148 मतं पडली. जॉन्सन यांनी 63 मतांनी हा अविश्वास ठराव जिंकला. या निकालामुळे जॉन्सन यांचं पंतप्रधानपद सुरक्षित राहिलं.
लॉकडाऊनमध्ये ‘डाऊनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधानांच्या निवासस्थानी वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत 40 हून अधिक खासदारांनी कोरोना संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. बऱ्याच दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत होतं. मात्र, कोरोना काळात पंतप्रधानांनी केलेल्या पार्ट्यांसंबंधीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर जॉन्सन यांच्या विरोधातील खदखद वाढली. रविवारी (5 जून) महाराणी एलिझाबेथ यांच्या राज्यारोहण सोहळ्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमादरम्यानच जॉन्सन यांना अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागू शकतं हे स्पष्ट झालं होतं.
त्यानंतर सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने जॉन्सन यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला. जॉन्सन यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी बंडखोर खासदारांना 180 मतांची गरज होती. मात्र, जॉन्सन यांनी 63 मतांनी हा अविश्वास ठराव जिंकला. जॉन्सन पराभूत झाले असते तर त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला असता. जॉन्सन यांनी अविश्वास ठराव जिंकणं ही ‘निर्णायक’ गोष्ट असून, आता पुढचं वर्षभर तरी त्यांच्या नेतृत्वाला आव्हान मिळणार नाही, असे सांगण्यात येते.