ब्रिटनच्या खासदाराची मागणी : संबंधित घटना ब्रिटनवरील कलंक
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमधील विरोधी पक्ष कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी ब्रिटन सरकारला 1919 च्या जालियांवाला बाग नरसंहारप्रकरणी भारताच्या लोकांची औपचारिक माफी मागण्याची सूचना केली आहे. ब्रिटिश सरकारने 13 एप्रिलपूर्वी माफी मागावी असे त्यांनी म्हटले आहे. पुढील महिन्यात जालियांवाला बाग नरसंहारच्या घटनेला 106 वर्षे पूर्ण होणार आहेत.
जालियांवाला बाग येथील आंदोलनात अनेक लोक स्वत:च्या परिवारासोबत सामील झाले होते. जनरल डायरने ब्रिटिश सैन्याच्या वतीने स्वत:च्या सैनिकांना तेथे पाठविले आणि निर्दोष लोकांवर बंदुकीतील गोळ्या संपेपर्यंत गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. जालियांवाला नरसंहार ब्रिटिश साम्राज्यावरील एक कलंक आहे. या घटनेत 1500 लोक मारले गेले होते आणि 1200 जण जखमी झाले होते. जे घडले ते चुकीचे होते असे वक्तव्य आमचे सरकार करु शकते का आणि औपचारिक स्वरुपात भारताच्या लोकांची माफी मागू शकते का अशी ब्रिटनच्या खासदाराने संसदेत विचारणा केली आहे. आजवर कुठल्याही ब्रिटिश पंतप्रधानाने जालियांवाला बाग नरसंहार प्रकरणी माफी मागितलेली नाही. परंतु अनेक ब्रिटिश नेत्यांनी वेळोवळी यासाठी खेद व्यक्त केला आहे, परंतु अधिकृतपणे माफी मागण्यात आलेली नाही.
2013 मध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी जालियांवाला बाग स्मारकाला भेट दिली होती. त्यांनी नरसंहाराला लाजिरवाणे ठरविले होते, परंतु माफी मागणे टाळले होते. यानंतर ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी 10 एप्रिल 2019 रोजी या घटनेला 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी वक्तव्य केले होते. त्यांनीही खेद क्यक्त केला होता, परंतु माफी मागितली नव्हती. 1997 मध्ये भारत दौऱ्यादरम्यान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी याला एक दु:खद घटना संबोधिले होते.
माफी का मागत नाहीत?
जालियांवाला बाग नरसंहारासाठी ब्रिटन सरकारने अधिकृतपणे माफी मागितली तर ते अनेक कायदेशीर आणि वित्तीय जबाबदाऱ्यांमध्ये अडकू शकते. माफी मागण्यात आल्यावर पीडित कुटुंबीयांकडून भरपाईची मागणी केली जाऊ शकते. ब्रिटन अशाप्रकारच्या आर्थिक भारापासून वाचू पाहत आहे, कारण वसाहतवाद काळात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यासाठी ब्रिटनला माफी मागावी लागू शकते.









