सुनक सरकारला सतर्क करणारा अहवाल
वृत्तसंस्था /लंडन
ब्रिटन सरकारच्या एका प्रमुख स्वतंत्र समीक्षा आयोगाने खलिस्तान समर्थक कार्यकर्त्यांच्या ‘विध्वंसक, आक्रमक आणि सांप्रदायिक’ कारवायांबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे.इंडिपेंडेंट फेथ एंगेजमेंट ऍडव्हायजर कोलिन ब्लुम यांच्या समीक्षा अहवालात 21 हजारांहुन अधिक लोकांच्या प्रतिक्रियांना सामील करण्यात आले आहे. हा अहवाल माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या देखरेखीत तयार करण्यात आला आहे. अहवालातील ‘शीख एक्स्ट्रेमिज्म’ नावाच्या भागात अत्यंत आक्रमक समुहाचे खलिस्तान समर्थक धर्माच्या नावाखाली कारवाया करत असल्याचे म्हणत ब्रिटिश शीख समुदायाच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटिश शिखांचा एक छोटा परंतु आक्रमक अल्पसंख्याक समूह असून त्याला मुलतत्ववादी ठरविले जाऊ शकते. खलिस्तान समर्थक केवळ भारतातील पंजाब राज्यावर दावा सांगू पाहत आहेत, परंतु त्यांच्या दाव्यात पाकिस्तानातील पंजाबचा हिस्सा सामील नाही. या कट्टरवाद्यांची प्रेरणा धर्मावर आधारित आहे की नाही हे पूर्णपणे स्पष्ट नाही. ब्रिटिश शीख समुदायातील कट्टरवादी घटक कुठे आहेत याचा शोध घेत अशा कारवाया रोखण्याची गरज असल्याची सूचना अहवालाद्वारे करण्यात आली आहे.









