बिघाडामुळे तिरुअनंतपुरम विमानतळावर होते उभे : ब्रिटनमधून आलेल्या टीमकडून दुरुस्ती
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
ब्रिटनच्या नौदलाचे लढाऊ विमान एफ-35बीने मंगळवारी 38 दिवसांनी केरळच्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आहे. हायड्रोलिक फेल झाल्याने या लढाऊ विमानाला उड्डाण करता आले नव्हते. या लढाऊ विमानाची दुरुस्ती करण्यासाठी 25 इंजिनियर्सची टीम 6 जुलै रोजी ब्रिटनमधून भारतात पोहोचली होती.
एफ-35बी हे लढाऊ विमान 14 जून रोजी रात्री संयुक्त सागरी अभ्यासाच्या अंतर्गत अरबी समुद्रावर नियमित उड्डाण करत होते. खराब हवामान आणि कमी इंधनामुळे केरळच्या तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. लँडिंगनंतर लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हे परतू शकले नव्हते.
918 कोटी रुपयांचे हे लढाऊ विमान ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स कॅरियर स्ट्राइक ग्रूपचा हिस्सा आहे. एफ-35 बीला जगभरात सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान मानले जाते. अमेरिकेचे हे अत्याधुनिक लढाऊ विमान अनेक दिवस विमानतळावरच उभे राहिल्याने त्याच्या क्षमतेवर जगभरातील तज्ञांकडून शंका व्यक्त केली जात होती.
ब्रिटिश दूतावासाने मानले आभार
एफ-35बी विमान मंगळवारी रवाना झाले आहे. 6 जुलैपासून तैनात ब्रिटिश इंजिनियर्सच्या टीमने दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणी पूर्ण करत विमानाला सक्रीय सेवेची अनुमती दिली. दुरुस्ती प्रक्रियेदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल ब्रिटन अत्यंत आभारी आहे. आम्ही भारतासोबतच्या संरक्षण भागीदारीला आणखी मजबूत करण्यासाठी तत्पर आहोत असे ब्रिटिश दूतावासाने म्हटले आहे.
लाइटनिंग नावाने प्रसिद्ध
एफ-35बी लढाऊ विमान ब्रिटिश सेवेत लाइटनिंग नावाने ओळखले जाणारे एफ-35 मॉडेल लढाऊ विमानाचे शॉर्टक टेक ऑफ/वर्टिकल लँडिंग (एसटीओव्हीएल) वेरियंट आहे. या लढाऊ विमानाला शॉर्ट-फील्ड बेस आणि विमानवाहू युद्धनौकांवरून संचालित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. छोट्या धावपट्टीवरून उड्डाण आणि वर्टिकल लँडिंगची क्षमता असलेले एफ-35बी हे पाचव्या पिढीचे एकमात्र लढाऊ विमान आहे. यामुळे हे लढाऊ विमान छोटा डेक आणि युद्धनौकांवरुन संचालनासाठी आदर्श ठरते.
लॉकहीड मार्टिन कंपनीकडून विकसित
एफ-35बी हे लढाऊ विमान अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीने विकसित केले आहे. या लढाऊ विमानासाठीचा प्रकल्प 2006 साली सुरू झाला होता. 2015 पासून हे लढाऊ विमान अमेरिकेच्या वायुदलात सामील आहे. एफ-35बी हे पेंटागॉनच्या इतिहासातील सर्वात महागडे विमान आहे. अमेरिका एका एफ-35 लढाऊ विमानावर सरासरी 82.5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 715 कोटी रुपये) खर्च करतो.









