वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
ब्रिटनच्या एका लढाऊ विमानाने भारतात इमर्जन्सी लँडिंग केले अहे. हे विमान तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड झाले आहे. या लढाऊ विमानातील इंधन पातळी खूपच कमी झाली होती. याचमुळे कुठल्याही आपत्कालीन स्थितीला टाळण्यासाठी या लढाऊ विमानाला तातडीने लँड करावे लागल्याचे समजते. हे लढाऊ विमान एफ-35 असून ते ब्रिटनच्या नौदलाकडून वापरले जाते.
या लढाऊ विमानाने एका विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण केले होते. यानंतर शनिवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी ते तिरुअनंतपुरम विमानतळावर सुरक्षितपणे लँड करविण्यात आले. लढाऊ विमानाच्या सुरक्षित लँडिंगसाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी तेथे इमर्जन्सी घोषित केली होती. इंधनाची पातळी कमी होत असल्याचे लक्षात आल्यावर वैमानिकाने इमर्जन्स लँडिंगची अनुमती मागितली होती. याप्रकरणी अत्यंत वेगाने अन् प्रोफेशनल पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा
रविवारी हे लढाऊ विमान विमानतळावरच उभे होते. केंद्र सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यावरच या लढाऊ विमानाला इंधन पुरविले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हे विमान स्वत:च्या विमानवाहू युद्धनौकेवर परतणार आहे.
भारतीय वायुदलासह सर्व यंत्रणांचा समन्वय
एफ-35 कडून विमानाला डायव्हर्ट (दुसऱ्या दिशेत वळविणे) करणे सामान्य बाब आहे. भारतीय वायुदल पूर्णपणे सतर्क असून याप्रकरणी नजर ठेवून आहे. संबंधित विमानाप्रकरणी सर्वप्रकारचे सहाय्य केले जात आहे. भारतीय वायुदल सर्व यंत्रणांसोबत समन्वय राखून प्रक्रिया राबवत असल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.









