राधानगरी/ महेश तिरवडे
देवगड निपाणी राज्यमार्गावरील राधानगरी तहसील कार्यालयाजवळील ब्रिटिशकालीन पुलाच्या दोन्ही बाजू खचल्या आहेत,तरीही धोकादायक रित्या वाहतूक सुरू आहे.तसेच पावसाळ्यापूर्वी या पुलावर फक्त खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती, सध्या या पुलावरील खडी निघून गेल्याने भले मोठे खड्डे पडले आहे, त्यामुळे येथील रस्ता खड्डेमय झाला आहे, तसेच या ठिकाणी किरकोळ अपघात झालेले आहेत तरी संभाव्य धोका उदभवण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारीचे उपाय करण्याची मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण व भाजपाचे तालुका उपाध्यक्ष डी जी चौगले यांनी केली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात बंदरी व्यापारी वाहतुकीसाठी महत्वाचा असणाऱ्या या मार्गावर दहा पूल त्या काळात उभारले होते त्यातील अनेक पूल नव्याने उभारले आहेत परंतु राधानगरी येथील पुलाचे सुमारे पाच ते सहा वर्षे स्ट्रक्चर ऑडिट होऊन नव्याने पूल उभारण्यात येणार असल्याचे सांगितले होते मात्र या संदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, असे चित्र स्पष्ट होत आहे, या पुलाच्या संरक्षण कठड्याच्या दुरुस्ती व्यतिरिक्त कोणतीही दुरुस्ती केलेली नाही,
सध्या या पुलाच्या दोन्ही बाजू खचल्याने धोका निर्माण झाला आहे,भिंतीवर वृक्ष उगवल्याने भिंत कमकुवत झाली आहे, तरीही अवजड वाहतूक सुरू आहे, धोक्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही.दिवसागणिक शेकडो अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून होतं असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने धोक्याबाबत सुचना फलक ही लावलेला नसल्याने एका दुर्दैवी घटनेनंतरच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणारं का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे, या पुला संदर्भात संबंधित खात्यास वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे ,येत्या काळात या पुलाचे दुरुस्तीचे काम न झाल्यास स्थानिक पातळीवर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे तालुका अध्यक्ष संभाजी आरडे, मनसे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, दीपक शिरगावकर, जनार्धन पाटील, उमेद निल्ले व स्थानिक नागरिकांनी दिली आहे









