वृत्तसंस्था/ हैदराबाद
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे हैदराबाद येथील भारतीय पोलीस सेवेच्या प्रोबेशनर्सच्या 75 व्या तुकडीच्या पासिंग आउट परेडमध्ये सामील झाले. भारतीय दंड संहिता (आयपीसी), सीआरपीसी आणि भारतीय साक्ष्य अधिनियमची जागा घेणारी तीन नवी विधेयके लवकरच संसदेकडून संमत करण्यात येतील असे शाह यांनी यावेळी म्हटले आहे.
ब्रिटिशांच्या राजवटीत तयार करण्यात आलेल्या कायद्यांना भारत संपविणार आहे आणि नवा आत्मविश्वास तसेच नव्या आशांसोबत एका नव्या युगात प्रवेश करणार आहे. गृह विषयक संसदीय स्थायी समिती तीन नव्या विधेयकांची पडताळणी करत आहे. लवकरच ही विधेयकं संमत केली जातील. नव्या कायद्यांचा उद्देश लोकांच्या अधिकारांचे रक्षण करणे आहे. महिला आयपीएस कॅडेट्सची वाढती संख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश महिला नेतृत्वयुक्त विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हणणे योग्य ठरेल असे उद्गार शाह यांनी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीत बोलताना काढले आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांनी तीन विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सादर केली होती. गृहमंत्री शाह यांनी या विधेयकांवर व्यापक विचारविनिमय आणि चर्चेसाठी ती स्थायी समितीकडे पाठविण्याची विनंती केली होती. या तिन्ही विधेयकांचे अध्ययन करण्यासाठी समितीला तीन महिन्यांचा कालावधी ऑगस्टमध्ये देण्यात आला होता.









