वृत्तसंस्था/ पर्थ
येथे पहिल्यांदाच खेळविण्यात येत असलेल्या युनायटेड चषक मिश्र सांघिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत गुरुवारी ड गटातील लढतीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. इंग्लंडच्या कॅमेरून नुरी आणि केटी स्वान यांनी आपले एकेरीचे सामने जिंकले आहेत.
या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात ब्रिटनच्या 14 व्या मानांकित कॅमेरून नुरीने ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी. मिनॉरचा 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात ब्रिटनच्या केटी स्वानने ऑस्ट्रेलियाच्या हिवेसवर 6-4, 6-3 अशी मात करत आपल्या संघाची आघाडी 2-0 अशी वाढविली आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनतर्फे पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळविली जात आहे. या मिश्र सांघिक स्पर्धेत एकूण 18 देश सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील सामने ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन, पर्थ आणि सिडनी या शहरांमध्ये खेळविले जात आहेत. प्रत्येक लढतीमध्ये पुरुष आणि महिलांच्या विभागात प्रत्येकी दोन एकेरी सामने आणि त्यानंतर एक मिश्र दुहेरीचा सामना खेळविला जात आहे.









