रशियाच्या सैनिकांनी युक्रेनमधील निरपराध नागरीकांवर अनन्वित अत्याचार केले असून हे सर्व युद्ध गुन्हे असल्याने ब्रिटन त्यांचा तपास करणार आहे. या युद्ध गुन्हय़ांचे पुरावे संकलित करण्यासाठी ब्रिटन लवकरच युक्रेनमध्ये आपले युद्धगुन्हा तज्ञ पाठविणार आहे. हे तज्ञ युक्रेनच्या तज्ञांना आणि प्रशासनांना साहाय्य करणार आहेत. या युद्धाच्या काळात रशियन सैनिकांनी युक्रेनच्या महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचारांचेही पुरावे गोळा पेले जाणार असून नंतर या सैनिकांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मे च्या पहिल्या आठवडय़ात ब्रिटनच्या तज्ञांचे हे दल प्रथम पोलंडमध्ये येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यातील सदस्य युक्रेनमध्ये जातील आणि तेथील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करतील. विशेषतः दक्षिण आणि पूर्व युपेनमध्ये त्यांचे वास्तव्य असेल. या दोन भागांमध्ये रशियन सैनिकांनी केलेल्या अत्याचारांच्या अधिकतर घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे तेथे सखोल पाहणी केली जाणार आहे. या दलाचा अहवाल या प्रकरणी महत्वाचा ठरणार असून त्याआधारे रशियन सैनिकांविरोधात गुन्हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल.
या दलातील तज्ञ रशियन अत्याचारांना बळी पडलेल्या महिलांचे नातेवाईक, बलात्कारपिडीत महिला, मुले आणि बालके यांचे जबाब नोंदविणार आहे. तसेच घरांची, इमारतींची आणि सार्वजनिक स्थानांची प्रत्यक्ष पाहणी करुन अत्याचारांची तीव्रता मापण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
दोन कार्यकर्ते रशियाच्या ताब्यात
युक्रेनमध्ये साहाय्यता करणाऱया ब्रिटीश स्वयंसेवी संघटनेचे दोन कार्यकर्ते रशियाने ताब्यात घेतल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. या संघटनेचे नाव पेसिडियूम नेटवर्क असे असून दक्षिण युपेनमधील झापोरीझझाया या चेकपोस्टवर त्यांना ताब्यात घेण्यात आले असे या संस्थेचे म्हणणे आहे.









