भारत-ब्रिटन करारानुसार होणार हस्तांतरण, ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा
बेंगळूर / वृत्तसंस्था
ब्रिटन भारताला लवकरच अत्याधुनिक जेट इंजिन निर्माण करण्याचे तंत्रज्ञान हस्तांतरीत करणार आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमान प्रदर्शनासाठी आलेले ब्रिटनचे संरक्षणमंत्री अलेक्स चॉक यांनी ही महत्वपूर्ण घोषणा निवडक पत्रकारांसमोर केली. भारत आणि ब्रिटन यांच्यातील करारानुसार हे हस्तांतरण होणार आहे. ब्रिटीश सरकारच्या अनुमतीनुसार ब्रिटनची रोल्स रॉईस ही कंपनी हे तंत्रज्ञान देणार आहे.
सध्या जगातील केवळ पाच देशांकडे अत्याधुनिक जेट इंजिने निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आहे. लवकरच भारत हे तंत्रज्ञान हाती असणारा सहावा देश होणार आहे. हे इंजिन पूर्णतः भारतीय निर्मितीचे असेल. त्याच्या निर्यातीवरही कोणतेही बंधन नसेल. ब्रिटनने या हस्तांतरणात पुढाकार घेतला असून गेली दोन वर्षे दोन्ही देशांनी यासंबंधात प्रदीर्घ अभ्यास आणि चर्चा केलेली आहे. आता लवकरच प्रत्यक्ष कृती केली जाणार आहे. ब्रिटनकडे हे तंत्रज्ञान अनेक दशकांपासून आहे. मात्र, भारताला जे तंत्रज्ञान हस्तांतरित पेले जाणार आहे, ते भारताच्या आवश्यकतांच्या अनुसार असेल. ते अत्याधुनिक असेल आणि इंधन बचतक्षम असेल. दोन्ही देशांच्या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानावर अभ्यास केला असून हे सुधारित तंत्रज्ञान भारताला दिले जाईल. यामुळे भारताची महत्वाची आवश्यकता पूर्ण होईल. ब्रिटनच्या इतिहासात अशा प्रकारे अन्य देशाला तंत्रज्ञान देण्याची घटना प्रथमच घडणार आहे, असे सुस्पष्ट वक्तव्य अलेक्स चॉक यांनी केले.
भारत हे नियमबद्ध राष्ट्र
भारत हे एक लोकशाहीवादी, सुस्थापित आणि नियमाने चालणारे राष्ट्र आहे. आपले सार्वभौमत्व सुरक्षित राखण्यासाठी भारताला अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाची आणि सामरिक क्षमतेची आवश्यकता आहे. या दृष्टीकोनातून रोल्स रॉईस कंपनीशी भारताचा होणारा हा व्यवहार अत्यंत महत्वाचा असून भारत आणि ब्रिटन यांच्यातील मैत्रीला त्यामुळे निर्णायक सुदृढता प्राप्त होणार आहे.
भारताला अमर्याद क्षमता मिळणार
रोल्स रॉईसशी भारताचा व्यवहार पूर्ण झाला तर भारताची जेट इंजिन निर्मिती क्षमता अमर्याद पातळीपर्यंत पोहचणार आहे. भारतातील रोल्स रॉईस कंपनी यासाठी साहाय्यभूत ठरु शकते. या कंपनीची भारतातील उत्पादन केंद्रे भारताला सामरिक विमानांची इंजिने बनविण्यासाठीही साहाय्यभूत ठरु शकतात. भारतासाठीही हा ऐतिहासिक क्षण असेल, असे चॉक यांनी स्पष्ट केले.









